दिलीप कोल्हटकर


<<मेधा पालकर>>

ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. बँकेत नोकरी करत असतानासुद्धा आपल्यातला कलेचा वारसा त्यांनी जतन केला. दिलीप कोल्हटकर हे मूळचे सांगलीचे. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४६ साली झाला. त्यांनी अर्थशास्त्र विषयातून बी.ए शिक्षण पूर्ण केले. पुढे बँक ऑफ बडोदामध्ये तीस वर्षे नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले. त्याचकाळात त्यांनी व्यावसायिक कलाकार म्हणून काम करायचे ठरविले. नाटककार बाळ कोल्हटकर हे त्यांचे काका आणि नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर हे त्यांचे चुलत काका. त्यामुळे त्यांना कलेचा वारसा घरातूनच मिळाला.

दिलीप कोल्हटकर हे हौशी आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व. नोकरी बँकेत करत होते तरीही नाटक हा त्यांच्यासाठी प्राणवायू असल्याने त्यावेळी म्हणजे ऐंशी ते नव्वदच्या सुमाराला रात्री साडेबारा वाजता सुटणाऱ्या शेवटच्या गाडीचे गार्ड दिलीप कोल्हटकर आले का अशी चौकशीही नियमित होत असे. त्यामुळे कोल्हटकर आल्याशिवाय मध्य रेल्वेची अखेरची गाडी त्यावेळच्या व्हीटी स्टेशनहून सुटत नाही असे कौतुकाने म्हटले जात असे. एक यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता आणि प्रकाश योजनाकार म्हणून नाटय़क्षेत्रात आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट आणि छोटा पडदा अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमांमध्ये वावरताना आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी त्यांनी उमटविला. उत्तम आणि अर्थपूर्ण, परिणामकारक प्रकाश योजनाकार ही त्यांचीं खास ओळख. पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता आणि पुण्याचे राजा नातू आणि भालबा केळकरांकडे नाटय़कलेचे शिक्षण घेतले. उन्मेष युवक प्रायोगिक रंगमंच या नाटय़संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते.

उन्मेषसाठी तीन तर आविष्कार या संस्थेसाठी दोन नाटके दिग्दर्शित केली. त्याचप्रमाणे बहुरूपी, एन.सी.पी.ए, नेहरू सेंटर आणि पृथ्वी थिएटरसाठी प्रत्येकी एका नाटकाचे दिग्दर्शन केले. बँक ऑफ बडोदासाठी १७ एकांकिका दिग्दर्शित केल्या आणि विशेष म्हणजे त्यासाठी आंतर बँक तसेच इंटर झोनल स्पर्धेतही प्रत्येक वेळी पुरस्कार मिळविले. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पन्नासहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यातल्या वीसहून अधिक नाटकांचे शंभरांहून अधिक प्रयोग झाले. सुयोग निर्मित मोरूची मावशी या नाटकाचे दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले.

ओम नाटय़गंधा निर्मित आई रिटायर होते या नाटकाचे सातशे, दुर्वांची जुडी निर्मित उघडले स्वर्गाचे दार या  नाटकाचे पाचशे, चंद्रलेखा या संस्थेच्या सोनचाफा, दीपस्तंभ आणि छावा या नाटकांचे प्रत्येकी चारशे तर आसू आणि हसू या नाटकाचे अडीचशे तसेच गोड गुलाबी या नाटकाचे अडीचशे श्री चिंतामणी संस्थेच्या आणि मकरंद राजाध्यक्ष या नाटकाचे दोनशे, रसिक मोहिनी निर्मित गोष्ट जन्मांतरीची या नाटकाचे दीडशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. असे व्यावसायिक मराठी नाटकांचे एकूण आठ हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत.

पार्टनर, जास्वंदी आणि मकरंद राजाध्यक्ष अशा काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयही केला. तीसहून अधिक मराठी नाटकांची प्रकाश योजनाही त्यांनी केली आहे. त्यातही खास उल्लेख करण्याजोगी नाटके म्हणजे बॅरिस्टर, हमीदाबाईची कोठी, उघडले स्वर्गाचे दार, चारचौघी ज्याचा त्याचा प्रश्न, पुरुष, आई रिटायर होतेय, वट वट सावित्री आदी नाटकांचा समावेश करावा लागेल. महत्त्वाचे असे की, ही सगळी पुरस्कारप्राप्त नाटके आहेत. अध्यात ना मध्यात आणि द्रष्टासारख्या छोटय़ा पडद्यावरील नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. सदू आणि दाद, सारं कसं शांत शांत आणि सांत्वन अशा पु. ल. देशपांडे लिखित तीन कथांवर आधारलेली तिय्या नावाची व्हिडीओ कॅसेटही त्यांनी दिग्दर्शित केली होती आणि ती त्यावेळी चांगलीच गाजली होती.

शेजारी शेजारी आणि ताईच्या बांगडय़ा अशा दोन चित्रपटांचेही दिग्दर्शन त्यांनी केले. नाटय़दर्पण पुरस्कार बारावेळा मिळविलेले मानकरी म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाटय़स्पर्धेत चार वेळा राज्य पुरस्कार त्यांना मिळाला. दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचा राहत्या घरात खून झाल्याचे उघड झाले होते. आता दिलीप कोल्हटकर यांचेही निधन झाले. एक प्रथितयश रंगकर्मीच्या आयुष्याच्या संध्याकाळी अशी किनार लाभणे दुर्दैवीच म्हणावे लागेल