सक्षम समर्थ मी!


>>प्रा. मेधा सोमण<<

स्त्रीशक्ती हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीतही पुराणकालातील गार्गी-मैत्रेयींप्रमाणे आजची स्त्री सक्षमपणे उभी आहे. सर्वच बाबतीत सरस ठरून.

हिंदुस्थानात प्राचीन कालापासून आजपर्यंत स्त्रियांनी हिंदुस्थानी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. केवळ वैयक्तिक कौटुंबिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रव्यापी संघर्ष करीत आदर्श निर्माण केले आहेत.

वेद उपनिषदकाळात वसिष्ठमुनींच्या पत्नीने अरुंधतीने वसिष्ठमुनी हिंदुस्थान यात्रेला गेल्यावर तपोवनाचा कारभार अत्यंत कष्टाने , जिद्दीने आणि आपल्या स्वकर्तृत्त्वाने सांभाळला. गार्गी ही ब्रह्मवादिनी स्त्री वचक्नु ऋषींची कन्या! जनकराजाच्या विद्वत्सभेपुढे तिने याज्ञवल्क्याला निर्भीडपणे प्रश्न विचारले. मनाचे समाधान झाल्यावर उदार मनाने तिने त्यांचे श्रेष्ठत्वही मान्य केले. गार्गीचा आदर्श ठेवणारी मैत्रेयी ही जनकराजाच्या मित्र नावाच्या प्रधानाची कन्या होय. कात्यायनी याज्ञवल्क्यांची पत्नी . मैत्रेयी तपोवनात कात्यायनीला मदत करीत असे. तिने याज्ञवल्क्यांकडून आत्मज्ञान जाणून घेतले.

त्याकाळातील गार्गी, मैत्रेयी, घोषा, सुलभा , गोधा, विश्ववारा, अपाला वगैरे ब्रह्मवादिनी स्त्रियांच्या ऋचा ऋग्वेदात समाविष्ट केलेल्या आहेत.त्याकाळात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अध्ययन करता येत असे. स्त्रियांना मानाचे स्थान देण्यात येत असे. पण उपनिषद काळाच्या अखेरीला ही स्थिती हळूहळू बदलली. विवाह लवकर होऊ लागले. आर्य- अनार्य संघर्षात स्त्रियांचे स्थान दुय्यम झाले. इसवीसन पूर्व २०० च्या सुमारास विवाहाचे वयं १२-१३ वर्षे इतके खाली आले. त्यामुळे अध्ययनाला कमी वेळ मिळू लागला. त्यानंतर बालविवाह, सतीची चाल सुरू झाली. जवळजवळ दोन हजार वर्षांचे तमोयुग होऊन गेले. नंतर हिंदुस्थानी स्त्रियांनी राजकारण, समाजकारण, कला, बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये आपली नाममुद्रा उमटविली आहे. या काळात अनेक स्त्रियांनी पतिनिधनानंतर प्रजाहित रक्षणार्थ प्रशासक म्हणून उत्तम कार्य केले आहे. चौथ्या शतकात वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हिने पतिनिधनानंतर वीस वर्षे उत्तम राज्यकारभार केला.सातवाहन वंशाचा सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता बलश्री कर्तबगार स्त्राr होती. तिने महाराष्ट्राला शकांच्या दास्यातून मुक्त केले. सोळाव्या ते अठराव्या शतकात जिजाबाई, येसूबाई, ताराबाई, राधाबाई अशा स्त्रियांनी राजकारणात ठसा उमटवला. अहिल्याबाई होळकर यांनी महान समाजकार्य केले. राणी लक्ष्मीबाई इंग्रजांबरोबर लढली. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्वकालात कस्तुरबा, अरुणा असफली, सरोजिनी नायडू वगैरे स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीत महान योगदान दिले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणात पहिल्या स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लोकसभेच्या पहिल्या स्त्री सभापती मीराकुमार, पहिल्या स्त्री विरोधीपक्ष नेत्या आणि आताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या नावाची नोंद झाली. समाजकारण, स्त्राrशिक्षण इत्यादी कार्यातही सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांनी नवीन उपक्रम सुरू केले. त्यातूनच लक्ष्मीबाई कानिटकर, सुलभा पाणंदीकर, अवंतिकाबाई गोखले, ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी स्त्री शिक्षण हेच कार्यक्षेत्र निवडले. समाजसेवाक्षेत्रात गोदावरी परुळेकर, साधनाताई आमटे, डॉ. राणी बंग, डॉ. स्मिता कोल्हे , सिंधुताई सकपाळ यांचे योगदान मोलाचे आहे. साहित्य, कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातही अनेक स्त्रियांनी मोलाचे कार्य केलेले आहे.

पूर्वी आणि आता!

गार्गी-मैत्रेयीच्या कालात ऋषिपत्नी किंवा ऋषिकन्या आणि राजघराण्यायातील स्त्रिया यांनाच विकासाची संधी मिळत असे. समाजाच्या सर्व थरातील स्त्रियांना प्रगतीसाठी संधी मिळत नसे. सध्या या आधुनिक काळात समाजाच्या सर्व थरातील स्त्रियांना शिक्षणाची, अर्थार्जनाची, समाजसेवेची, उद्योग व्यवसाय करून प्रगती साधण्याची संधी मिळत आहे. अर्थात हे करीत असतांना आजच्या स्त्रियांसमोर कौटुंबिक जबाबदारी, वाढती असुरक्षितता, प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा, वाढती महागाई अशी आव्हानेही आहेत. परंतु नवीन तंत्रज्ञान, नवीन भौतिक साधने, आधुनिक संपर्क व्यवस्था, प्रवास साधनेही स्त्रियांना उपलब्ध आहेत. प्रगतीसाठी नवीन संधीही उपलब्ध होत आहेत. आजच्या गार्गी मैत्रैयीना प्राचीनकाळच्या प्रगत स्त्रियांचा इतिहास लाभलेला आहे. अन्यायाला वाचा फोडून तो दूर करण्याची शक्ती वाढली आहे. मंदिरात पुजली जाणारी देवी आज घराघरात प्रगतीसाठी कार्यमग्न झाली आहे. कर्तव्ये पार पाडतानाच आजच्या गार्गी-मैत्रेयी हक्कांबाबत जागृत झाल्या आहेत.