कोरठण यात्रेच्या नियोजनची संयुक्त बैठक संपन्न

56

सामना प्रतिनिधी । नगर

श्री क्षेत्र कोरठण खंडोबा यात्रेच्या शेवटच्या व मुख्य दिवशी मानाच्या काठ्यांच्या शासकिय महापूजेनंतर बेल्हा जि.पुणे येथील मानाची काठी प्रथम श्री खंडोबाचे कळस दर्शन घेईल. त्यानंतर ब्राम्हणवाडा ता. अकोले येथील मानाची काठी देवदर्शन घेईल, असा निर्णय कोरठण यात्रेच्या नियोजनच्या शेवटच्या प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, मानाच्या काठ्या, पालख्यांचे मानकरी यांच्या संयुक्त बैठकीत झाला व तो पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी जाहीर केला.

यावेळी निवासी नायब तहसिलदार आर. बी.काथवटे, अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, माजी उपाध्यक्ष रामदास मुळे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, विश्वस्त अमर गुंजाळ, यात्रा समिती अध्यक्ष किसन धुमाळ, महेंद्र नरड, आगार प्रमुख पराग भोपळे, शांताराम खोसे, राजु मटाले, सुरेश गायकर, किसन मुंढे, बन्सी ढोमे, भगवान भांबरे, गोपीनाथ घुले, सरपंच अर्जुन देशमाने, हनुमंत सुपेकर, अच्युतराव जगदाळे, महावितरणचे पाटील, तानाजी मुळे यांच्यासह मानाच्या काठी पालखी गावांचे ग्रामस्थ, शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

मागील वर्षी बेल्हा ग्रामस्थांनी शांततेत यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी काठ्यांच्या महापूजेनंतर ब्राम्हणवाडेकरांना प्रथम देवदर्शन घेण्याची संधी दिली होती व पुढील वर्षी बेल्हा काठी प्रथम कळस दर्शन घेणार असे ठरले होते. त्यानुसार बेल्हेकर आजच्या बैठकीत मागील वर्षीच्या निर्णयावर ठाम होते तर ब्राम्हणवाडेकर या निर्णयाला तयार होत नव्हते. शेवटी अॅड. गायकवाड व पोलीस निरीक्षक पोवार यांनी हस्तक्षेप करीत निर्णय जाहीर केला.

यावेळी आगार प्रमुख पराग भोपळे यांनी विविध ठिकाणाहून कोरठणसाठी एस टी च्या ४० जादा बस सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलीस बंदोबस्त, सीसीटिव्ही कॅमेरे, आरोग्य व्यवस्था, रस्त्याची डागडुजी, वाहनतळ, वाहतुक व्यवस्था, वीज पुरवठा, पाणी पुरवठा याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला यात्रेत विना परवानगी फ्लेक्स लावण्यास बंदी असुन खाजगी वाहनतळ चालकांनी वाहनतळावर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे व रात्री दिवे लावण्यात यावे, असे पो. निरिक्षक पोवार यांनी यावेळी स्पष्ट केले. परंपरेप्रमाणे, भक्तीभावात व शांततेत यात्रा उत्सव पार पाडावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड यांनी केले. दरम्यान, नांदगाव जि. नाशिकच्या तहसिलदार भारती सागरे यांनी देवस्थानला भेट दिली

आपली प्रतिक्रिया द्या