रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळा

मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी, 7 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबतील. माटुंगा येथे अप जलद मार्गावर या गाड्या वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्ग
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. मेगा ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील.
या कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.