गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’चा मेगाब्लॉक

सामना ऑनलाईन । मुंबई

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेने रविवारच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक राबविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. रविवारी मेगाब्लॉकच्या दिवशी चालविण्यात येणार्‍या मर्यादित फेर्‍यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असतात. त्याचप्रमाणे गुरुवारी कमी लोकल फेर्‍या चालविल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेने गणेश चतुर्थीच्या दिवशी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडण्याचे जाहीर केल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण होणार आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतेकजण आपापल्या कुटुंबकबिल्यासह नातेवाईकांकडे जात असल्यामुळे लोकलला प्रचंड गर्दी होत असते. त्यात कमी फेर्‍या चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडणार आहे. रेल्वेच्या कर्मचार्‍यांना गणपतीची पूजा करण्यास संधी मिळावी यासाठी सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा लोकलच्या फेर्‍या कमी चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने आगाऊ सूचना दिल्याने प्रवाशांना लोकल फेर्‍यांची संख्या कमी असेल हे लक्षात घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.