‘या’ विचित्र कारणामुळे मेघनच्या लग्नाला तिचे वडील जाणार नाही

सामना ऑनलाईन । लंडन

राजकुमाराशी मुलीचे लग्न होत असताना वडील मात्र या शाही विवाहसोहळ्याला हजर राहणार नाहीयेत. इंग्लंडचा राजपुत्र हॅरी याच्यासोबत मेघन मर्केल या अभिनेत्रीचा विवाह निश्चित झाला आहे. मात्र मेघनचे वडील थॉमस मर्केल त्यांच्या लग्नाला हजर राहणार नाहीयेत. ही बातमी ऐकल्यानंतर मेघन आणि हॅरी हे चिंतेत पडले असून त्यांनी थॉमस यांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. थॉमस मर्केल हे या लग्नाला हजर न राहण्यामागचं कारणही जरा विचित्र आहे.

थॉमस मर्केल यांनी लग्नासाठी सूट शिवायचं ठरवल्यानंतर ते माप देण्यासाठी टेलरकडे गेले होते. यावेळी माप घेतानाचे काही फोट त्यांनी पाप्पाराझींना विकले. या छायाचित्रांची एकूण किंमत ही एक लाख डॉलर्स म्हणजे जवळपास ६७ लाख रूपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्या या वागण्यावरून त्यांच्यावर भयंकर टीका झाली. आपण लग्नात गेलो, तर लग्नापेक्षा आपल्या या हावरटपणाचीच जास्त चर्चा होईल अशी त्यांना आता भीती वाटायला लागली आहे. यामुळेच थॉमस यांनी या लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतलाय.