अमित शहांच्या वक्तव्यावर मुफ्तींचा पलटवार, मतभेद होते तर …

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये भाजप पीडीपीची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. जम्मू-लडाखशी भेदभाव केल्यामुळेच ‘पीडीपी’शी युती तोडली असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

‘जम्मू आणि लडाख यांच्यात भेदभाव केल्याचा आरोप निराधार आहे. जम्मू-कश्मीर खोऱ्यांवर लक्ष देणं जास्त गरजेचं होते आणि जर याच मुद्द्यावरून भाजपबरोबर आमचे मतभेद होते तर मग आधीच केंद्र आणि राज्य सरकारसमोर हा मुद्दा का नाही मांडला, असा सवाल मुफ्ती यांनी केला आहे. तसेच जम्मू-कश्मीर सरकारच्या प्रत्येक निर्णयात भाजपचे समर्थन होते’, असेही मुफ्ती यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मोदी सरकारने विकासासाठी खूप काही काम केले. निधी दिला, संस्था दिल्या, योजना दिल्या, पण ‘पीडीपी’ने मात्र जम्मू आणि लडाखच्या बाबतीत पक्षपातीपणा सुरूच ठेवला. त्यामुळेच जम्मू-कश्मीरमध्ये भाजपने सरकारबाहेर पडून विरोधी पक्षांत बसणे पसंत केले, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी एका कार्यक्रमात विधान केले होते. तसेच राज्यातील नागरिकांना दिलेली आश्वासनही पीडीपीमुळे पूर्ण करता आली नाही असा आरोपही शहा यांनी केले होते.