कश्मीरमध्ये ताकदीचं राजकारण चालणार नाही, मेहबुबा मुफ्तींचं भाजपवर शरसंधान

सामना ऑनलाईन । श्रीनगर

भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी या राजीनाम्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. कश्मीरमध्ये दडपशाहीचं राजकारण चालू शकणार नाही, असं म्हणत मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी या राजीनाम्यामागची कारणं सांगताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘आम्ही जम्मू आणि कश्मीरमधील जनतेच्या भल्यासाठी भाजपशी युती केली होती. केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षासोबत युती झाल्यानंतर कश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही ही युती केली होती. कश्मीरच्या जनतेच्या मनात कलम ३७० मुळे भीती निर्माण झाली होती, ते भय आम्ही कमी केले. आमच्या प्रयत्नांमुळे शस्त्रसंधी झाली. पाकिस्तानसोबत चांगले संबंध निर्माण व्हावेत अशी आमची इच्छा आहे’, असं मेहबुबा मुफ्ती यावेळी म्हणाल्या.

‘गेल्या काही काळापासून कश्मीर खोऱ्यातली परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला आहे. अद्यापही कश्मीर खोऱ्यात शांततेसाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. त्यासाठी चर्चा गरजेची आहे. कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दडपशाही किंवा ताकदीचं राजकारण चालणार नाही’, असं म्हणत मुफ्ती यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.