मेहुल चोक्सीने आयसीआयसीआय, अलाहाबाद, आंध्रा आणि बँक ऑफ इंडियालाही गंडवले

बाबासाहेब गायकवाड । नाशिक

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील सूत्रधार नीरव मोदी याचा साथीदार गीतांजली जेम्सचा अध्यक्ष मेहुल चोक्सी याने बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, अलाहाबाद, आयसीआयसीआय, आंध्रा, कॉर्पोरेशन या बँकांनाही हजारो कोटींचा चुना लावल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून फसलेल्या व्यापाऱयांनी त्याची तक्रार तीन वर्षांपूर्वी थेट पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय यांच्याकडे केली होती.

गीतांजली जेम्स लिमिटेडचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मेहुल चोक्सी याने फ्रॅन्चाईजीच्या नावाखाली देशभरात अनेक व्यावसायिकांना गंडा घातला आहे. त्याच्याकडून फसवणूक झालेले वैभव खुरानिया यांनी ३ मे २०१५ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील संचालक निलीमेश बरूहा यांना पत्र पाठविले, त्यात त्यांनी चोक्सी याने लहान-मोठय़ा गुंतवणूकदारांबरोबरच अनेक बँकांना, आर्थिक संस्थांना हजारो कोटींना फसविल्याचे नमूद केले आहे. त्याच्या कंपन्यांवर ४ हजार कोटींहून अधिक कर्ज आहे, त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून४५० कोटी, अलाहाबाद बँकेकडून ४०० कोटी, आयसीआयसीआय बँकेकडून ३०० कोटींचे कर्ज घेतले. कॉर्पोरेशन बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया यांच्याकडूनही कर्ज उचलले, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, याची अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतली गेलेली नाही किंवा कुठलीही चौकशी झालेली नाही, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

आर. एम. ग्रीन सोल्यूशन्स प्रा.लि.चे संचालक वैभव खुरानिया व दीपक बन्सल यांनी ६ मे २०१५ रोजी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) देवेन भारती, गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी, इओडब्ल्यूचे सहआयुक्त धनंजय कमलाकर, झोन-८ चे उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांनाही पत्र पाठविले होते. त्याची प्रत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, नवी दिल्ली येथील ईडीचे संचालक डॉ. राजन कटोच, ‘सेबी’चे उत्तर विभागीय व्यवस्थापक; सीबीआय, इकॉनॉमिक ऑफेन्स वींगचे सहआयुक्त सतिश गोलचा यांना पाठविली होती.

यांचीही झाली फसवणूक
गुजरातच्या भावनगरमधील डी. एच. जडेजा यांची तब्बल ६० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथील अमीत कुमार यांनी भाऊ अमर कुमार याच्या नावे फ्रॅन्चाईजी घेवून ५ कोटी रुपये डिपॉजिट भरले होते. सन २०१० ला सुरू झालेला हा व्यवसाय सन २०१३ ला बंद पडला असून, चोक्सीने दिलेला चेक बाऊन्स झाला. त्यांची पाच कोटींची फसवणूक झाली असून, दिल्ली न्यायालयात खटला सुरू आहे. यांच्याव्यतिरिक्त गीतांजलीची फ्रॅन्चाईजी घेतलेले बंगळुरू येथील हरी प्रसाद, राजस्थानमधील जोधपूर येथील एस. के. जैन आणि गीतांजली ज्वेलरी रिटेल लिमिटेडचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांचीही चोक्सीने फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार वैभव खुरानिया आणि दीपक बन्सल यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

…तेव्हाच घोटाळा उघडकीस आला असता
मेहुल चोक्सीच्या घोटाळ्याबाबत सन २०१४ पासून लढा सुरू आहे. पंतप्रधान कार्यालय, सेबी, सीबीआय, ईडी, पोलीस महासंचालक आदी सर्वच ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या. वेळीच कारवाई झाली असती तर तेव्हाच हा हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला असता, असे गीतांजलीचे माजी व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांनी सांगितले.