अटलजींच्या दहा आठवणी…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

1. टी.व्ही. बंद करताच हिरमुसले
अटलबिहारी वाजपेयी हे 2009 सालापासून म्हणजे गेली नऊ वर्षे आजारी आणि बेडवरच होते. 2014 सालातील किस्सा. ते टीव्हीवर निवडणूक निकाल पाहत-ऐकत होते. लकवाग्रस्त असल्याने त्यांना बोलता येत नसे, पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्यांची प्रतिक्रिया समजायची. परिवारातील सदस्य आणि मदतनीस त्यांना वृत्तपत्रे वाचून दाखवत. वाजपेयी एकदा लोकसभेतील कामकाजाचे प्रसारण टीव्हीवर पाहत बसले होते. त्याचवेळी कोणीतरी टीव्ही मध्येच बंद केला. त्यावेळी ते एखाद्या बालकाप्रमाणे हिरमुसले होते. पुन्हा टीव्ही चालू करताच त्यांच्या चेहऱयावर हसू उमटले होते. जुने चित्रपट टीव्हीवर दाखवले जात असताना वाजपेयी त्यात मग्न होऊन जायचे.

2. संसदेत पायीच चालत जायचे
वाजपेयींचा हा किस्सा आहे 1957 सालातला. त्यावेळी ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले होते. त्या काळात भाजप नेते जगदीश प्रसाद माथूर आणि अटलजी हे दोघे चांदणी चौक येथे एकत्र राहायचे. संसदेत ते पायीच जायचे आणि पायीच घरी परतायचे. सहा महिन्यांनंतर एकदा वाजपेयी यांनी स्वतःच माथूर यांना रिक्षाने जाण्यासाठी गळ घातली. ते पाहून माथूर यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्यावेळी खासदारकीचे सहा महिन्यांचे वेतन त्यांना एकरकमी मिळाले होते. त्यामुळे वाजपेयींना रिक्षातून संसदेत जाण्याची इच्छा झाली होती. त्या काळात ‘रिक्षा’ ही आमच्यासाठी चैनच होती, असे भाजप नेते माथूर सांगतात.

3. वाजपेयी यांच्या प्रभावामुळे आडवाणी यांना न्यूनगंडाने पछाडले
जनसंघाची स्थापना 1951 सालात झाली. त्याचे पहिले अधिवेशन 1953 मध्ये झाले होते. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी त्या अधिवेशनाला ‘प्रतिनिधी’ म्हणून राजस्थानहून गेले होते. अधिवेशनात त्यांनी वाजपेयी यांना पहिल्यांदा पाहिले आणि त्यांचे भाषण ऐकले. नंतर वाजपेयी एकदा राजस्थानात आले असता जनसंघाने आडवाणी यांना त्यांच्यासोबत राहण्याचे निर्देश दिले होते. वाजपेयींचा त्यांच्यावर जीवनभरासाठीचा अमीट प्रभाव पडला होता. इतकेच नव्हे तर वाजपेयी यांच्या भेटीनंतर आणि प्रभावामुळे आडवाणी यांना न्यूनगंडाने पछाडले होते. आडवाणी हे कॅथॉलिक शाळेत शिकलेले होते. त्यातच त्यांना हिंदी भाषा फारशी अवगत नव्हती. जिथे वाजपेयींसारखे योग्य नेतृत्व आहे त्या पक्षात आपला टिकाव काय लागणार, या प्रश्नाने त्या काळात आडवाणी यांना छळले हाते. हा किस्सा खुद्द आडवाणी यांनीच पत्रकारांना अनेकदा सांगितला आहे.

4. निवडणुकीत पराभव होताच सिनेमा पाहायला निघून गेले
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी पक्षासाठी एकत्रित जिवाचे रान केले त्या काळातील हा किस्सा आहे. दिल्लीत नयाबांस येथील पोटनिवडणूक होती. प्रचंड परिश्रम करूनही पक्षाला पराभूत व्हावे लागल्याने ते दोघेही कमालीचे दुःखी झाले होते. पण त्याचक्षणी वाजपेयी हे आडवाणींना म्हणाले की, ‘चला, कुठला सिनेमा पाहून येऊ या!’ त्यांच्या पक्षाचे कार्यालय त्यावेळी अजमेरी गेट येथे होते, तर नजीकच्या पहाडगंज येथे ‘थिएटर’ होते. ते दोघे तिथे पोहोचले तेव्हा तिथे राज कपूर यांचा ‘फिर सुबह होगी’ हा सिनेमा लागला होता. त्यावरून आडवाणी वाजपेयींना त्यावेळी म्हणाले होते की, आपण आज हरलो आहोत. पण तुम्ही पाहाच सुबह जरूर होगी!

5. वाजपेयींना न विचारताच पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तेव्हा…
लालकृष्ण आडवाणी यांनी सांगितलेला हा किस्सा आहे. 1995 सालातील भाजपची मुंबईत सभा होती. त्यात आडवाणी म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱया निवडणुकीत आपला पक्ष जिंकेल आणि आमचे अटलजी हे पंतप्रधान बनतील याची पुरेपूर खात्री मला वाटत आहे. त्यानंतर वाजपेयींनी लगेचच आडवाणींना विचारले की, हे तुम्ही काय जाहीर करून बसलात? मला साधे विचारलेदेखील नाही! त्यावर आडवाणी त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा अधिकार पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मला जरूर आहे.

6. बालकांसारखा ‘डिज्नीलॅण्ड’चा आनंद लुटला
प्रदीर्घ राजकीय प्रवासात अटलबिहारी वाजपेयी यांनी असंख्य चढउतार अनुभवले. पण त्यांच्यात दडलेले एक ‘निरागस बालक’ अखेरपर्यंत कायम होते. 1993 सालातील ही गोष्ट आहे. अमेरिकेच्या दौऱयावर असताना फुरसत मिळताच वाजपेयी हे ग्रॅण्ड केनियन आणि डिज्नीलॅण्ड येथे धडकले होते. तिथे रांगेत उभे राहून तिकिटे खरेदी केली आणि ‘राइडस्’चा आनंद त्यांनी लुटला होता.

7. वाजपेयींच्या शपथविधीत नरसिंह रावांची चिठ्ठी
वाजपेयी यांनी 1996 सालात पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. हा किस्सा शपथविधीनंतर लगेचच घडलेला आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव हे आले आणि वाजपेयी यांच्या हाती एक छोटीसी चिठ्ठी कोंबली. राव यांनी त्या चिठ्ठीत दोन मुद्दे लिहिले होते. ही दोन कामे इच्छा असूनही पंतप्रधान म्हणून मला करता आली नाहीत. तुम्ही ती कामे पार पाडा, अशी विनंती नरसिंह राव यांनी वाजपेयींना त्या चिठ्ठीतून केली होती.

8. स्वतःला ‘भारतरत्न’ कसा देऊ?
कारगीलच्या युद्धानंतर ‘एनडीए’च्या सरकारमधील काही मंत्री तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीसाठी एकत्रितपणे गेले होते. ‘आम्ही तुम्हाला ‘भारतरत्न’ देऊ इच्छित आहोत,’ असे त्या मंत्र्यांनी वाजपेयींना सांगितले. पण वाजपेयी त्या मंत्र्यांवर भडकले होते. ‘मी स्वतःलाच ‘भारतरत्न’ देऊ काय’, असा सवाल त्यांनी केला. भविष्यात एखाद्या सरकारला वाटले तर ते देऊ शकतील मला ‘भारतरत्न’. मी स्वतःला देणार नाही, असे वाजपेयींनी सुनावले होते. कारगील युद्धानंतर दोन राष्ट्रांतील संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी 2001 सालात पाकिस्तानचे लष्करशहा परवेज मुशर्रफ यांना आग्रा येथे निमंत्रित केले होते, पण दहशतवादाविरोधातील वाजपेयींच्या ठाम भूमिकेमुळे मुशर्रफ यांना खाली मान घालून पाकिस्तानात परतावे लागले होते.

9. वाजपेयी ‘पीएम’ बनतील! नेहरूंचेच भाकीत होते
‘अटलबिहारी वाजपेयी : ए मॅन फॉर ऑल सिजन’ या किंगशुक नाग यांच्या ग्रंथाचा हवाला देत ‘बीबीसी’ने पंडित जवाहरलाल नेहरू आणि वाजपेयी यांच्यातील एक किस्सा जगासमोर आणला हाता. हिंदुस्थान भेटीवर आलेल्या एका ब्रिटिश राजदूताशी वाजपेयी यांची भेट नेहरू यांनी घडवली होती. त्यावेळी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून देताना नेहरू म्हणाले होते की, ‘यांना भेटा, हे विरोधी पक्षातील उमदे आणि उदयोन्मुख नेते आहेत. माझ्यावर नेहमीच टीका करत असतात. पण त्यांच्यात मला भविष्यातील अनेक शक्यता दिसतात. एक दिवस हे देशाचे पंतप्रधान बनतील!

10. नवाज शरीफांना दिला जबरदस्त झटका
पाकिस्तान पत्रकार नसीम जेहरा यांचे ‘फ्रॉम कारगिल टू द कॉप’ हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. अटलजी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची हिंदुस्थान भेट बाणेदारपणे रद्द केल्याचा प्रसंग त्यात कथन करण्यात आलेला आहे. 1999 सालात शरीफ हिंदुस्थानात येणार होते. त्यांनी फॅक्सद्वारे ‘गुडविल मेसेज’ही पाठविला होता. त्याला रात्री 10 वाजता अटलजी यांनी पाठवलेले प्रत्युत्तर म्हणजे जणू बॉम्बगोळाच ठरला होता. वाजपेयींनी ठणकावले होते – नवाज शरीफजी, मी तुम्हाला हिंदुस्थानात मुळीच निमंत्रित करत नाही. कारगीलमधून तुमचे सैन्य हटवा, एवढेच आपणास सांगत आहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये चर्चेची सुरुवात होण्यासाठी ते अपरिहार्य आहे.