स्मरण – विस्मरण !

401

‘आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे…’ आपल्या स्मृतिकोषातल्या काही आठवणी अशा धूसर असतात, तर काही अगदी सूर्यप्रकाशासारख्या लख्ख. वय वाढत गेलं तरी पन्नास – साठ वर्षांपूर्वी घडलेली एखादी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली किंवा आपोआप जतन झालेली घटना अगदी काल-परवा घडल्यासारखी वाटते.

वयाची शंभरी उलटल्यानंतरही ‘मला चांगलं आठवतंय’ असं म्हणत त्या घटनेचं चित्र आपल्या नजरेसमोर उभं करणाऱया काही व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा विलक्षण आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्मृतिसंग्रहात काय काय दडलेलं असेल! व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक जीवनातील चढउतार, कडू-गोड प्रसंग, अनेकांशी जुळलेलं नातं, मैत्री आणि वियोग. एकूणच सर्वच भावभावनांचा रंगीबेरंगी पट. तो चित्रपटासारखा केव्हाही पाहाता यावा अशी मेंदूमधली अजब रचना. स्मरणरंजन करून मन सुखावण्याचा काळ हा उतारवयाचा. परंतु प्रत्येक आठवण सुखावह असेलच असंही नाही. ‘विसरता आलं असतं तर बरं झालं असतं’ असं वाटणाऱया आठवणीही स्मरणात असतातच. ते एक पॅकेज डील आहे. केवळ वेचक, निवडक आठवणी शोकेसमधल्या आकर्षक वस्तूंसारख्या जपून ठेवाव्यात आणि बाकीच्या अडगळीत टाकाव्यात असं होत नाही.

बरं. आठवणींचा ओघ कोणत्या प्रसंगापासून कुठे जाईल सांगता येत नाही. एकामागून एक उमटणाऱया तरंगलहरींसारख्या आठवणी येत राहतात. रोजच्या कामाच्या व्यापात ‘आठवणी’त रमण्याइतकी सवडच नसते. परंतु एखाद्या निवांत क्षणी त्या जाग्या होतात. मेंदू नावाच्या आजही बऱयाच अंशी अगम्य असलेल्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवाची ही किमया आहे.

स्मरणशक्तीची गरज सर्वानाच भासते. काल-आज-उद्या याची सांगड घालायची तर स्मृतिशक्ती अबाधित हवी. नाहीतर काल काय घडलं ते आठवणार नाही आणि उद्या काय करायचं ते उगमणार नाही. पूर्वी बालवयात मुलांकडून बऱयाच गोष्टी ‘पाठ’ करून घेतल्या जायच्या. हे पाठांतर किती योग्य-अयोग्य यावरही भरपूर चर्चा झालीय. नेमकं काय पाठ करावं हे कळलं तर हा प्रश्न सुटेल. कविता पाठ करणं योग्य. गणित पाठ करता येत नाही ते सोडवावंच लागतं.

खरं, तर त्या व्यक्तीलाही बालपणीचा अनेक गोष्टी आठवत असतीलच. त्या कदाचित वेगळ्या संदर्भातल्या असतील. कारण मेंदूचं मेमरी कार्ड अद्भुत आहे. अब्जावधी न्युट्रॉन्सचा व्यवहार जिथे अव्याहत सुरू असतो त्या मेंदूमधल्या स्मरणकोषाचा थांग आतापर्यंत लागला नव्हता. आतापर्यंत असं म्हणण्याचं कारण म्हणजे ऑस्ट्रियामधल्या काही संशोधकांनी एखादी गोष्ट आपल्या कायमची लक्षात का आणि कशी राहते याचा उलगडा झाल्याचं म्हटलं आहे. मेंदूतल्या ‘शार्प वेव्ह रिपल्स’चा (तीक्र लहरतरंग) अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की मेंदूत निर्माण होणाऱया तीन महत्त्वाच्या लहरींपैकी स्मरणाशी संबंधित असे हे लहरतरंग आहेत.

आणखी तांत्रिक माहिती कंटाळवाणी होईल. मूळ मुद्दा असा की यामुळेच आपण कळायला लागल्यापासून (किंवा जन्मापासून) कळत-नकळत जे काही पाहातो, अनुभवतो ते मेंदूत खोल कुठेतरी जाऊन दडतं आणि तसंच काहीसं वर्तमानकाळात घडलं की मेंदू निमिषार्धात त्याची सांगड त्या घटनेशी घालतो आणि आपल्याला आठवतं! आपण अनेकदा म्हणतो, ‘अरे यावरून एक आठवलं…’ मग गप्पांमध्ये आठवणींचा सिलसिला सुरू होतो.

अनेकदा आपल्याला मुद्दाम आठवावं लागतं. स्मृतिकोषात ठेवलेल्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतात. परीक्षेचा पेपर लिहिताना पूर्वी केलेला अभ्यास अचूक आठवणं फार महत्त्वाचं असतं. गाणं म्हणताना, भाषण करताना अनेक गोष्टी सहजतेने आठवूनच कार्यक्रम पार पडतो. कोणतीही कला किंवा संशोधन करताना पूर्वी काय घडलं अथवा केलं याची मेंदूमधली नोंद जितकी स्पष्ट तितकाच पुढचा आविष्कार अधिक प्रभावी ठरतो. पुनः पुन्हा त्याच गोष्टी वाचाव्या, पहाव्या लागत नाहीत.

वाढत्या वयात अनेकांना डिमेन्शिया किंवा विस्मरणाचा त्रास होऊ लागतो. आपल्याला आठवत नाही, हेच आठवलं नाही तरी ठीक; पण प्रयत्न करूनही एखादं गाणं, नाव, एखादी तारीख किंवा प्रसंग आठवत नाही तेव्हा आपण किती बेचैन होतो ते आठवून पहा. दातात अडकलेल्या तुसाप्रमाणे अस्वस्थता येते आणि ती गोष्ट आठवली की हायसं वाटतं. मार्क ट्वेन या विनोदकाराने आत्मकथा लिहिताना म्हटलं की ‘मला अगदी बालपणापासूनचं सगळं आठवतं. इतकं आठवतं की जे घडलेलंच नाही तेही आठवतं’! यातली गंमत जाऊ द्या, मेमरी करप्ट झाली तर आठवणींची उलटापालटही होऊ शकते. ‘मला असं वाटतंय खरं’ हे किती खरं नि भ्रामक याचा अंदाज येत नाही. थोडक्यात काय मेंदूची (मनाची) शक्ती अफाट, अगाध आहे. स्मरण आहे म्हणून तर आयुष्य घडवण्याची उमेद आहे.

<<  दिलीप जोशी >\>

आपली प्रतिक्रिया द्या