मानसिक अपंगत्व!

jyotsna-gadgil>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘हा हँडीकॅपचा डबा आहे, जे सुदृढ आहेत त्यांनी लगेच उतरा!’ दोन्ही हातात कुबड्या घेऊन अपंगांच्या डब्यात चढलेला एक प्रवासी डब्यातली गर्दी पाहून थेट ‘टीसी’च्या भूमिकेत गेला. त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्या माणसाने मोबाईल काढला आणि व्हिडिओ मोड ऑन करून एकेक प्रवाशाच्या चेहेऱ्यासमोर धरत, ‘हँडीकप सर्टिफिकेट दाखवा’ असे म्हणत शहानिशा करायला सुरुवात केली. असा जाब याआधी कोणी न विचारल्याने बचावाचा पवित्रा घेत, घुसखोरी करून त्या डब्यात चढलेल्या सुदृढ लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. कॅमेरा बंद करण्याची सूचनावजा धमकी दिली. ‘तू विचारणारा कोण टीसी लागून गेला रे’ असे म्हणत एकाने टरही उडवली, तसा त्याचा पारा चढला आणि तो म्हणाला, ‘मी अपंग आहे, तुमच्यापेक्षा वेगळा! हा डबा शारीरिक अपंगांसाठी आहे! पण तुमच्यासारखे मानसिक अपंग या डब्यात गर्दी करतात म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशाला टीसी ची भूमिका घ्यावी लागते. जीवनाशी आमचा रोजचा संघर्ष सुरूच आहे, पण तुमच्यासारखे मानसिक अपंग भेटतात म्हणून आणखी त्रास होतो! दाखवा तुमचं सर्टिफिकेट!’

त्याचं सगळं बोलणं समोरच्या माणसासकट कॅमेऱ्यात कैद होत होतं. एव्हाना इतर घुसखोर, त्याने जाब विचारण्याआधी उतरण्याच्या विचाराने दाराकडे सरसावले. हळू हळू गर्दी ओसरली. अपंगांच्या डब्यात फारशा सीट नसल्याने आणि असलेल्या सीट सुदृढ माणसांनी बळकावलेल्या असल्यामुळे तो हताश होऊन दाराजवळ कुबड्या ठेवत एका तरुणाच्या मदतीने खाली बसला. एवढा वेळ लढा देऊनही त्याला बसायला जागा मिळालीच नाही. बाकीचे मानसिक अपंग त्याच्याकडे नुसते पाहत राहिले.

‘तुम्ही करा वट्ट वट्ट, आम्ही आहोत निगरगट्ट!’ ह्या म्हणीचे मूर्तिमंत उदाहरण बघायला मिळत होते. अर्थात हे चित्र पहिल्यांदा बघण्यात आले, असे नाही. कमी-जास्त फरकाने अशा निर्लज्ज माणसांचा वावर समाजात सर्वत्र असतोच, मात्र त्या अपंग व्यक्तीने केलेला आक्रोश काळजाचा ठाव घेत होता. ‘मी अपंग आहे , जगण्याशी संघर्ष करतोय आणि तुमच्यासारख्या मानसिक अपंगांशीही!’ हे त्याचे शब्द कानात घुमत होते. अशा मनोरुग्णांचा उपचार कसा आणि कोणी करायचा हा मोठा प्रश्नच आहे!

द्वितीय श्रेणीच्या महिला डब्याला लागून अपंगांचा डबा असल्याने तिथल्या घडामोडी रोज दिसत असतात. इतर डबे जसे गर्दीने खच्चून भरलेले असतात, तसा अपंगांचा डबाही ‘फुल्ल’ जातो. एकाएक अपंगांच्या संख्येत एवढी वाढ कशी झाली, हा प्रश्न रोज पडायचा. पण जाब कोणाला विचारणार आणि कोण विचारणार? सगळेच अपंग लुळे-पांगळे नसतात, त्यात मूक-बधिर, अंध, अनेक प्रकारचे आजार झालेले रुग्ण, गर्भवती महिला, अपघात झालेली मंडळी यांचाही समावेश असतो. अनेकदा तिथे दोन मुक्यांना हावभावातून भरभरून बोलताना पाहिले आहे, अंधांना काठी टेकत टेकत चढताना पाहिले आहे, बधिरांना कानाचे यंत्र नीट करताना पाहिले आहे. त्यांच्यात भर असते ती, अशा सुदृढ मानसिक अपंगांची, जे केवळ गर्दी टाळण्यासाठी अपंगांच्या डब्याचा आधार घेतात.

परदेशात सर्वसामान्य नागरिकांइतकाच अपंग, दिव्यांग नागरिकांच्या प्राथमिक गरजांचा विचार केला जातो. तिथले नागरिक, शारीरिक दुर्बल असलेल्या व्यक्तींना आपणहून मदतीचा हात देतात. महिला किंवा ज्येष्ठ नागरिक सहप्रवासी असल्यास, त्यांना बसण्यासाठी प्राधान्य देतात. परदेशातील अशा चांगल्या गोष्टींचे अनुकरण आपल्याकडे केले जात नाही. त्यांचे राहणीमान, जीवनशैली आपल्याला खुणावते, परंतु त्यांचे शिष्टाचार अंगी बाणण्याचा आपण साधा प्रयत्नही करत नाही.

सुदृढ असूनही आपण दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटांपुढे हतबल होतो. निरोगी शरीराची साथ असल्यामुळे अडचणींवर मात करून पुन्हा नव्याने उभे राहतो. मात्र, अपंग व्यक्तींच्या आयुष्यातले उणेपण आपण भरून काढू शकत नाही. अशात आपण मदत करू शकलो नाही, तरी किमान आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.