माल्ल्याचा गौप्यस्फोट, देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची घेतली होती भेट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याने लंडनमधील वेस्टमिनिस्टर कोर्टात प्रत्यार्पणाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान मोठा गौप्यस्फोट केला आहे. देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, असे माल्ल्याने सांगितले.

यावेळी विजय माल्ल्या म्हणाला की, ‘देश सोडण्यापूर्वी तडजोडीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती. परंतु बँकांनी माझ्या तडजोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.’ तसेच आपण थकबाकी भरण्यासही तयार असल्याचेही माल्ल्या म्हणाला. यावर उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, मी या भेटीबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही असे माल्ल्या म्हणाला.

जेटलींनी आरोप फेटाळले

दरम्यान माल्ल्याच्या या गौप्यस्फोटानंतर अर्थमंत्री जेटली यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. मी त्याची 2014 नंतर कधीही भेट घेतली नाही, असे स्पष्टीकरण जेटली यांनी दिले आहे.

दरम्यान, हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी वेस्टमिनिस्टर कोर्टात मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात विजय मल्ल्यासाठी केलेल्या विशेष सेलचा व्हिडिओ दाखवला. कोर्टाने हा व्हिडीओ तीन-तीन वेळा पाहिला. हिंदुस्थानातील कारागृहांची अवस्था खराब असल्याने आपल्याला हिंदुस्थानकडे सोपवले जाऊ नये अशी विनंती माल्ल्याने केली होती.

…तर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहविभागाकडे जाणार

दरम्यान, कोर्टाने माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली तर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहविभागाकडे सोपवण्यात येणार आहे. माल्ल्या कोर्टाच्या निर्णयाला पुढील कोर्टात आव्हानही देऊ शकतो.

किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असणारा माल्ल्या गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जारी झालेल्या प्रत्यार्पण वॉरंटनंतर जामीनावर आहे. त्याच्यावर सुमारे 9 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. यापूर्वी जुलैमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना आर्थर रोड कारागृहाच्या बराक क्र. 12 चा व्हिडिओ जमा करण्यास सांगितले होते.