गुरुवारी पहाटे उल्कावर्षाव !

सामना प्रतिनिधी । मुंबई

येत्या गुरुवार, ४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजल्यापासून ईशान्य दिशेस स्वाती नक्षत्राच्या डाव्या बाजूला भूतप तारकासंघातून या नूतन वर्षातील पहिला उल्कावर्षाव होताना दिसेल, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, साधारणतः यावेळी ताशी चाळीसपेक्षा जास्त उल्का पडताना दिसतात. मात्र यावेळी उल्कादर्शनात चंद्रप्रकाशाचा अडथळा येण्याची शक्यता आहे.

अवकाशातील धुलिपाषाण ज्यावेळी गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे झेपावतात त्यावेळी वातावरणाशी होणाऱया घर्षणामुळे जळून जातात त्यावेळी आपणास प्रकाशित रेषा दिसते. त्याला ‘उल्का’ असे म्हणतात. तो पाषाण जर मोठा असेल तर संपूर्ण जळून न जाता पृथ्वीवर येऊन आदळतो. त्याला ‘अश्नी’ असे म्हणतात. उल्कांचे दर्शन साध्या डोळ्यांनी होते. शहरातील दिव्यांच्या प्रकाशाचा अडथळा येतो म्हणून शहरापासून दूर गेल्यास उल्कावर्षाव चांगला दिसू शकतो, असेही सोमण यांनी सांगितले.