‘सावत्र वडील रात्री अंथरुणात घुसले,’ तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

सामना ऑनलाईन । लखनौ

घरात, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात वाचा फोडणारे #MeToo कॅम्पेन सुरू आहे. त्यानंतर अनेक अभिनेत्रींपासून ते सामान्य नागरिकांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. याच #MeToo कॅम्पेनअंतर्गत उत्तर प्रदेशमधील एका तरुणीने व्हिडिओद्वारे धक्कादायक सत्य मांडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओमधील तरुणीचे नाव आफरीन खान असे आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आफरीनने आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणावरील कविता ऐकवली होती. या कवितेला ‘टेप अ टेल’ (Tape A Tale) नावाच्या युट्यूब चॅनेलने अपलोड केले असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. क्या आपको याद है? अशी या व्हिडिओची सुरुवात असून यात तिने आपले वडिलांसोबत कसे संबंध होते याची माहिती दिली आहे.

वडिलांनी तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे म्हणत आपल्या आईसोबतचे संबंध संपूष्टात आणले. तलाकनंतर अम्मीने (आई) दुसऱ्यासोबत लग्न केले. एकदा आई काही कामानिमित्त लखनौला गेली तेव्हा सावत्र वडील माझ्या अंथरुणात घुसले होते आणि अश्लिल चाळे करू लागले. त्यांच्या अशा वागण्यामुळे आपले जीवनच बदलून गेले, असे आफरीनने सांगितले आहे.