मेट्रो-३ अनावश्यक

प्रातिनिधिक

>>सरला डिसूझा<<

कुलाबा  ते सीप्झ अंधेरी हा भुयारी रेल्वेमार्ग कुलाब्याहून अंधेरी येथे जाण्यासाठी बांधला जाणार आहे. हा मार्ग कुलाबा कफ परेड येथून विधान भवन, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी टर्मिनस, डॉकयार्ड, मुंबई सेंट्रल वगैरे ठिकाणांहून काढला जाणार आहे. म्हणजे हा मार्ग वेडावाकडा असेल. यासंदर्भात खालील गोष्टी विचारात घ्याव्याशा वाटतात. सीप्झ हे अंधेरी व विक्रोळी-कांजूरमार्ग स्टेशनच्या जवळ आहे. हुतात्मा चौकाच्या जवळच छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे. तिथून हार्बर लाइनच्या लोकलही सुटतात. त्या गाड्या अंधेरीला पण जातात. तिथे उतरून बसने सीप्झला जाता येते. मध्य रेल्वेच्या विक्रोळी किंवा कांजूरमार्ग स्थानकात उतरूनही सीप्झला जाता येते. हुतात्मा चौकाच्या डाव्या बाजूला चर्चगेट असून तिथूनही लोकल सतत धावत असतात, ज्या अंधेरी स्थानकातून जातात. तेथे उतरून सीप्झला जाता येते. म्हणजे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर लाइन या तिन्ही मार्गांवरून अंधेरीला जाता येते. सीप्झ हे तिन्ही मार्गानी जोडले आहे. अंधेरी व विक्रोळी तसेच कांजूरमार्ग या ठिकाणाहून बससेवा चांगल्याप्रकारे उपलब्ध आहेत. एका अहवालानुसार दक्षिण मुंबईतील लोकसंख्या कमी होत आहे व उपनगरातील लोकसंख्या, लोकवस्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत कुठले अन् किती लोक कुलाब्याहून कफ परेडहून सीप्झ येथे जाणार आहेत? किती लोकांना या भुयारी मेट्रोचा फायदा होणार आहे? पश्चिमेला समुद्र अगदी जवळच आहे. भुयारी मार्ग खोदताना किती तरी खोलवर खोदावे लागेल. मुंबई भूकंपप्रवण क्षेत्रात येते. मुंबई हे बेट आहे. पुन्हा मेट्रोच्या कामामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे (चिराबाजार, गिरगाव, ग्रॅण्ट रोड वगैरे) पुनर्वसन कुठे करणार? या ठिकाणी जास्त करून मराठी लोकांची वस्ती आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन असे वाटते कीं, मेट्रो-३ हा भुयारी मार्ग अनावश्यक आहे. सरकारने त्याचा अट्टहास करू नये.