आजपासून मुंबईच्या पोटात घरघर

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या पोटात आजपासून घरघर सुरू होणार आहे. मेट्रो रेल्वेचा भुयारी मार्ग बनवण्यासाठी आणलेल्या महाकाय टीबीएम मशीनद्वारे उद्यापासून टनेलिंगचे काम सुरू केले जाणार आहे. माहीमच्या नयानगर येथून उद्या दुपारी त्याचा शुभारंभ होत आहे. मेट्रो-३ कॉरिडोरसाठी पहिल्यांदाच मुंबईत ही मशीन वापरली जात आहे. चीन येथील गुआंगझोऊ येथून ही मशीन गेल्या जुलैमध्ये मुंबईत आणली गेली. जर्मनीच्या हेरेनक्नेच एजी कंपनीने त्यांच्या चीनमधील कारखान्यात या मशीनची निर्मिती केली.

या मशीनद्वारे भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर २०१९पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने ठेवले आहे. माहीमच्या नयानगर येथून हे भुयारी मार्गाचे काम सुरू होणार आहे. जमिनीखाली २५ मीटर खोलवरून हे टनेलिंगचे काम करण्यात येणार आहे. सिद्धिविनायक ते धारावीदरम्यान ६.०८ किलोमीटरचे दोन बोगदे बनवले जाणार आहेत. दोन टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिला टप्पा एप्रिल २०१९मध्ये, तर दुसरा टप्पा सप्टेंबर २०१९पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.