म्हाडा सोडतीने केले ८१९ जणांचे गृहस्वप्न साकार

सामना प्रतिनिधी । मुंबई

म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असतानाही ज्या काही अर्जदारांनी म्हाडाचे अर्ज भरले होते त्यापैकी ८१९ जणांचे स्वप्न पूर्ण झाले. यात काही घरांसाठी एकच अर्ज आल्यामुळे लॉटरीआधीच १२ अर्जदार विजेते ठरले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज म्हाडाच्या ८१९ घरांची सोडत निघाली. त्यावेळी मुंबईकरांनी मोठ्य़ा प्रमाणात गर्दी केली होती.

मुंबईत ज्यावेळी हक्काचे घर मिळते त्यावेळी एखादा माणूस खऱ्या अर्थाने मुंबईकर होतो आणि आज आम्ही खऱ्या अर्थाने मुंबईकर झालो. गेली कित्येक वर्षे घरासाठी सुरू असलेली वणवण आता थांबली असून त्याबद्दल म्हाडाचे आभार मानतो, अशी भावना म्हाडाच्या विजेत्यांनी व्यक्त केली.

मुंबईत २०२२पर्यंत ५० हजार घरे
मुंबईत २०२२पर्यंत म्हाडाची ५० हजार घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. ‘एमएमआरडीए’च्या परिसरात ही स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रंगशारदा येथे आज म्हाडाच्या ८१९ घरांची सोडत निघाली. त्यावेळी विनोद तावडेही तिथे उपस्थित होते. शनिवारी गोरेगाव येथे ५ हजार घरांची टेंडर्स निघणार आहेत. त्यामुळे ज्यांना या सोडतीत घर लागले नाही त्यांनी निराश होऊ नका, असेही तावडे म्हणाले.

सेलिब्रेटींनाही लॉटरी
सेलिब्रेटींनाही कलाकार कोटय़ातून घर लागले आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद हिला विक्रोळी कन्नमवारनगर येथे घर मिळाले तर अभिनेता मिलिंद शिंदे यांनाही घर लागले आहे. ‘आभाळमाया’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेल्या आणि अलीकडे मनवा नाईक दिग्दर्शित ‘पोरखेळ’ या चित्रपटात काम करणाऱया स्वरांगी मराठे हिलाही कांदिवलीमधील चारकोपमध्ये घर लागले आहे.