मुंबईचा विजयी पंच, हार्दिक पांड्याची अष्टपैलू चमक

3
hardik-pandya-ipl-mumbai

>> जयेंद्र लोंढे, मुंबई

हार्दिक पांडय़ाच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सोमवारी वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमधला पाचवा विजय अगदी रुबाबात मिळवला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मात्र स्पर्धेत सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. हार्दिक पांडय़ाने 16 चेंडूंत नाबाद 37 धावांची खेळी करीत मुंबई इंडियन्सला 19व्या षटकात पाच गडी राखून विजय मिळवून दिला. यात त्याने दोन षटकार व पाच चौकारांची आतषबाजी केली.

7 षटकांत 70 धावा, पण…

धावांचा पाठलाग करणाऱया मुंबई इंडियन्सला कर्णधार रोहित शर्मा व क्विण्टॉन डी कॉक याने धडाकेबाज सुरुवात करून दिली. दोघांनी सात षटकांत 70 धावांची भागीदारी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या वेळी विराट कोहलीने आठवे षटक टाकण्यासाठी मोईन अलीच्या हाती चेंडू सोपवला. रोहित शर्मा व क्विण्टॉन डी कॉक ही जोडी सुसाट खेळत असतानाच मोईन अलीने त्याला ‘ब्रेक’ लावला. सुरुवातीला रोहित शर्माचा झपकन आत येणाऱया चेंडूवर त्रिफळा उडवला. त्यानंतर क्विण्टॉन डी कॉकला पायचीत पकडले. रोहित शर्माने 28 धावांची, तर क्विण्टॉन डी कॉकने 40 धावांची खेळी साकारली.

विराट अपयशी

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या उपस्थितीत सोमवारी इंग्लंडमधील वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली. मात्र टीम इंडियाच्या ‘या’ कर्णधाराला वानखेडे स्टेडियमवर आपली धमक दाखवता आली नाही. जेसन बेहरेनडोर्फच्या अप्रतिम चेंडूवर विराट कोहली यष्टीरक्षक क्विण्टॉन डी कॉककरवी झेलबाद झाला. त्याला आठ धावाच करता आल्या.

95 धावांची शानदार भागीदारी

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आपला ठसा उमटवता आलेला नाही. विराट कोहली व पार्थिव पटेल बाद झाल्यानंतर ए.बी. डिव्हिलीयर्स व मोईन अली यांच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी आली. दोघांनी तिसऱया विकेटसाठी 95 धावांची शानदार भागीदारी रचली. मोईन अलीने 32 चेंडूंत पाच सणसणीत षटकार व एक चौकारासह 50 धावा फटकावल्या. ही जोडी धावफलक पुढे नेणार असे वाटत असतानाच लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. धिम्या चेंडूवर तो ‘डिपस्क्वेअर लेग’ला उभ्या हार्दिक पांडय़ाकरवी झेलबाद झाला. मोईन अलीने या खेळीत अफलातून फटके मारले.

मलिंगाचे चार बळी

मोईन अली बाद झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मदार ए.बी. डिव्हिलीयर्सवर होती. त्याने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजीही केली. 51 चेंडूंत चार षटकार व सहा चौकारांसह दक्षिण आफ्रिकेच्या या माजी खेळाडूने 75 धावा फटकावल्या. कायरॉन पोलार्डच्या अचूक थ्रोवर तो धावचीत झाला. तसेच लसिथ मलिंगाने मोईन अलीनंतर मार्कस स्टोयनीस (0), अक्शदीप नाथ (2 धावा), पवन नेगी (0) यांना बाद करीत मुंबई इंडियन्ससाठी मोलाची कामगिरी बजावली. त्याने 31 धावा देत चार फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराहने एक षटक निर्धाव टाकत अवघ्या 22 धावा दिल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 7 बाद 171 धावा फटकावल्या.