दुबईत उभारला दहा हजार फुलांचा मिकी माऊस

सामना ऑनलाईन । दुबई

विविध जातींच्या आणि रंगांच्या तब्बल दहा हजार फुलांपासून मिकी माऊसची तब्बल ३५ टन वजनाची प्रतिमा दुबईत उभारण्यात आली आहे. मिकीच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त फुलांपासून तयार करण्यात आलेल्या या प्रतिकृतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

मिकी माऊस म्हणजे लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आवडते कार्टून. कार्टून शोमध्ये करामती करणाऱ्या मिकीला विविध रूपात पाहणे प्रत्येकालाच आवडते. हा फुलांचा मिकी दुबईतील मिरॅकल गार्डने येथे उभारण्यात आला आहे. या मिकीची उंची १८ मीटर असून हा मिकी ७ टन स्टील संरचना आणि ५० टन काँक्रीटवर उभा आहे.

मिरॅकल गार्डन आणि द वॉल्ट डिझ्ने यांच्यात एक करार झाला आहे. त्यानुसार पुढील हिवाळ्यात जेव्हा हे गार्डन सुरू होईल तेव्हा डिझ्नेमधील आणखी सहा कार्टून कॅरेक्टरची प्रतिकृती या गार्डनमध्ये उभारण्यात येतील. मिकीची ही मूर्ती सुमारे १०० मजुरांनी साकारली असून त्यासाठी ४५ दिवस लागले, अशी माहिती मिरॅकल गार्डनचे मालक अब्दुल नासर यांनी दिली.