कितीहा उशीर

विद्या कुलकर्णी, पक्षी निरीक्षक

थंडीच्या दिवसातले काही पाहुणे आपल्याला अगदी हवेहवेसे वाटतात. पण यंदा मात्र त्यांचं आगमन जरा लांबलंय… का बरं असं व्हावं…?

हिवाळय़ाची चाहूल लागली. गुलाबी थंडी शरीराला व मनाला सुखावू लागली. नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर संपायला आला, पण अजून आपले पाहुणे पक्षी आलेच नाहीत. सारे मुंबईकर ज्या पाहुण्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात ते स्थलांतरित पक्षी कुठे वाट चुकले कळेना.

का रुसले हे पक्षी मुंबईवर? मी विचारातच पडले. नक्कीच काहीतरी अडचण आलेली असणार. थोडासा विचार केला तेव्हा लक्षात आले. या वेळी पाऊस खूपच लांबला, रेंगाळला. त्यामुळे थंडी पण उशिरा सुरू झाली. त्यातच मोठे संकट अरबी समुद्रात येऊन ठेपले. अरबी समुद्राचा लांब पश्चिम किनारा ‘ओखी’ चक्रीवादळामुळे ढवळून निघाला. ५ डिसेंबरला या वादळामुळे मुंबईमध्ये ७-१० मिलीमीटर पाऊस पडला व पहाडी लाटांमुळे समुद्रकिनारा, दलदलीचा प्रदेश, चिखल भाग सर्वांचेच नुकसान झाले. वातावरणात धुरळा, धुके पसरून प्रदूषण वाढले. या सर्व वातावरणातील बदलांमुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले. त्यामुळे अजून तरी हवेहवेसे वाटणारे पक्षी दूरच राहिले आहेत.

ओखी वादळाची सुरुवात कशी झाली, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. या वादळाचा उगम कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन गल्फ ऑफ थायलंडमध्ये झाला व गुजरातजवळ अरबी समुद्रात अंत झाला. चार हजार नॉटिकल मैल या वेगाने धावणारे हे वादळ श्रीलंका, कन्याकुमारीमध्ये पसरले. तिकडे चक्रीवादळाचे स्वरूप धारण करून व लक्षद्वीपमध्ये मार्ग बदलून तामीळनाडू, केरळ, महाराष्ट्र व गुजरात इत्यादी ठिकाणी पोचले. इतका प्रचंड प्रवास करून अतोनात नुकसान करूनच शमले.

पक्ष्यांना येणाऱया हवामानातील बदलाची, संकटांची, वादळे किंवा तुफान यांची चाहूल कशी काय लागते हे मानवाला पडलेले एक कोडे आहे. परंतु मानवाने आश्चर्यकारकरीत्या पक्ष्यांच्या स्थलांतराचे विज्ञान ओळखले आहे. एका खंडातून दुसऱया खंडात प्रवास करणाऱया पक्ष्यांचे निरीक्षण केले आहे. वर्षानुवर्षे अचूक त्याच जागी पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून येतात हे ओळखले आहे. राजहंस मंगोलियातून हिंदुस्थानात येतात किंवा रोहित पक्षी केनयातून समुद्र खंड पार करून हिंदुस्थानात; गुजरात, मुंबई, पुलिकत येथे येतात. करकरा क्रौंच इराण, किर्गिस्तानमधून हिंदुस्थानात येतात. मुंबईमध्ये बाहेरून दूर देशातून रोहित, बगळे, वेगवेगळे तापस, हळद्या, तांबट, शराटी, चमचा, कमळपक्षी इत्यादी पक्षी येतात.

मुंबईतील पशु-पक्षी यांचे जीवन जपण्यासाठी तातडीने काही उपाय करणे फार जरुरीचे आहे. मुंबईतील खारफुटी, दलदलीच्या जागा, खाडय़ा यांचे संवर्धन करणे फारच महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या मते पक्ष्यांच्या या हक्काच्या जागा आक्रसत चालल्या आहेत. जेएनपीटी कस्टम हाऊस, उरण इत्यादी ठिकाणी भराव टाकून व्यावसायिक उपयोगासाठी जागेचा वापर करण्याचा प्रयत्न होत आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे. एकेकाळी इकडे हजारोंच्या संख्येने रोहित पक्षी दिसत असत. घार, घीवर, शिक्रा, कोकीळ हे स्थानिक पक्षी पण दिसेनासे झाले आहेत. वेळीच सावध होऊन मुंबईचा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचा खजिना, नैसर्गिक भौगोलिक सौंदर्य जपायला पाहिजे.