अरण्य वाचन…कुठून कुठून येतात पक्षी…

अनंत सोनवणे

नांदूरमध्यमेश्वर. अनेक स्थानिक पक्ष्यांसोबत स्थलांतरीत पक्ष्यांचेही हे हक्काचे घर आहे. हे अभयारण्य महाराष्ट्राचे पक्षीतीर्थ आहे.

कुठून कुठून येतात पक्षी

आणि आभाळ भरून जातं

सोनेरी नादांची भरजरी नक्षी

आभाळ दिमाखात मिरवीत रहातं

कवी सुधीर मोघे यांच्या कवितेतले हे शब्द प्रत्यक्षात अनुभवायचे असतील, तर नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट द्यायलाच हवी. नाशिक जिल्हय़ाच्या निफाड तालुक्यात हे पक्षी अभयारण्य आहे. गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर खानगाव थडी इथं १९०७ च्या सुमारास एक दगडी बंधारा बांधण्याचं काम सुरू झालं.१९१३ मध्ये ते पूर्ण झालं. या बंधाऱयामुळे या परिसरात एक विस्तीर्ण जलाशय निर्माण झाला. ते पाणी, त्यातल्या पाणवनस्पती, दलदल या साऱयाचा परिपाक म्हणून हा परिसर देशी-विदेशी पक्ष्यांसाठी आदर्श नैसर्गिक अधिवास बनला. अनेक स्थानिक पक्ष्यांनी इथं कायमस्वरूपी मुक्काम ठोकला. स्थलांतरित पक्ष्यांचं हे आवडतं वस्तीस्थान बनलं. पुढे १९८६ मध्ये या परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातलं पक्षीतीर्थ म्हणून ओळखलं जातं. इथं उथळ व दलदलयुक्त पाणथळ परिसराबरोबरच सदाहरित जंगल व माळरान जमीनही आहे. तसंच आसपास शेतीही आहे. त्यामुळे पक्ष्यांना भरपूर खाद्य उपलब्ध होतं. पक्ष्यांच्या स्थानिक प्रजातींबरोबरच देशी-विदेशी स्थलांतरित पक्षीही या अभयारण्याला विशेष पसंती देतात. पक्षी संपदेच्या या वैविध्यामुळेच जगप्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांनी नांदूरमध्यमेश्वराला ‘महाराष्ट्राचं भरतपूर’ म्हणून गौरवलं.

migrant-bird

स्थानिक आणि स्थलांतरित मिळून सुमारे ३०० च्या आसपास पक्ष्यांच्या प्रजाती इथं पाहायला मिळतात. इथल्या स्थानिक पक्ष्यांमध्ये पुढील प्रजातींचा समावेश आहे- जांभळा बगळा, राखी बगळा, हळदी-कुंकू बदक, मराल बदक, काळा शेराटी, मोर शेराटी, जांभळी पाणकोंबडी, चांदी बदक, शिक्रा, अडई, टिबुकली, जंगल लावा इत्यादी. स्थलांतरित पक्ष्यांच्या इथं आढळणाऱया प्रजातींपैकी काही पुढीलप्रमाणे- रोहित, चक्रवाक, पट्टकादंब, सामान्य क्रौंच, करकरा क्रौंच, थापटय़ा बदक, रंगीत करकोचा, पांढरा करकोचा, तुतारी, दलदल हारीण, झोळीवाला, लालसरी, चतुरंग बदक, काळय़ा शेपटीचा पाणटिवळा इत्यादी.

पक्षीप्रेमींना पक्ष्यांचं व्यवस्थित निरीक्षण करता यावं यासाठी वनविभागानं चापडगावात अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. पर्यटकांना राहण्याची व्यवस्था आहेच, शिवाय पक्षीनिरीक्षणासाठी ७ मनोरे उभारण्यात आले आहेत. इथं दुर्बिणी आणि स्पॉटिंग स्कोपही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इथले आठ-दहा स्थानिक तरुण गाईड म्हणून काम पाहतात आणि पर्यटकांना पक्ष्यांबद्दल माहिती देतात.

पक्ष्यांच्या अधिवासात दोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱयांमध्ये बंदिस्त होत असलेल्या दृश्यांचं थेट प्रक्षेपण एका मोठय़ा पडद्यावर केलं जातं. त्यामुळे पक्षीविश्वाचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी पक्षीप्रेमींना मिळते. विशेषतः वृद्ध, लहान मुलं व दिव्यांग व्यक्तींसाठी ही व्यवस्था खूपच सोयीची ठरते. पक्ष्यांविषयी ममत्व असलेल्या प्रत्येक निसर्गप्रेमीने एकदा तरी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला अवश्य भेट द्यावी. फक्त आपल्या उपस्थितीने पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही, परिसरात कचरा होणार नाही, पक्ष्यांना खायला टाकण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी घ्यावी.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

प्रमुख आकर्षण…देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी

जिल्हा…नाशिक, तालुका…निफाड, राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…१०० चौ.कि.मी., निर्मिती…१९८६

जवळचे रेल्वे स्थानक… निफाड (१२ कि.मी.)

जवळचे विमानतळ…संभाजीनगर (१८० कि.मी.)

निवास व्यवस्था…सिंचन व वनविभागाची विश्रामगृहे व इको हटस्.

सर्वाधिक योग्य हंगाम…नोव्हेंबर ते जानेवारी

सुट्टीचा काळ…नाही, सुट्टीचा दिवस…नाही