‘चीनच्या वाढत्या शक्तीने धास्तावलेल्या जगाचे हिंदुस्थानकडे लक्ष’

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची ताकद सातत्याने वाढत असून चीन सध्या जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला आव्हान देताना दिसत आहे. त्यामुळे चीनच्या वाढत्या ताकदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष हिंदुस्थानकडे लागले असल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले. तसेच चीनने आपल्या लष्करावरील खर्च आणि अर्थव्यवस्था दोन्हीमध्ये वाढ केल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष सध्या हिंद महासागर आणि प्रशांत महासागराकडे वळल्याचे जनरल रावत यांनी स्पष्ट केले.

चीनचा प्रभाव जसा वाढत आहे तसे जगभरातील देशांनी हिंदुस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. हिंदुस्थानच असा देश जो चीनला नियंत्रणात ठेवू शकतो, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. चीनच्या अडेलटप्पू भूमिकेमुळे आशियाई देशांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे जनरल रावत यांनी दक्षिण चीन सागराचा उल्लेख न करता म्हटले.

संरक्षणावरील खर्च ओझे नाही
संरक्षणावरील खर्चावर बोलताना जनरल रावत म्हणाले की, ‘सामान्य लोकांना असे वाटते की संरक्षणावरील खर्च म्हणजे देशावरील ओझे आहे. संरक्षणावरील खर्चाचा आपल्याला परतावा मिळत नाही असे त्यांना वाटते. आम्ही त्यांची ही भावना दूर करण्याचा प्रयत्न करू’, असे जनरल रावत म्हणाले. पायदल, नौदल आणि वायुसेना आणखी मजबूत करण्याचा आपला प्रयत्न असेल असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले. तसेच संरक्षणासाठी राखीव खर्चापैकी ३५ टक्के रक्कम राष्ट्राच्या कार्यासाठी खर्च करण्यात येते. लष्कर सीमारेषेवरील गावांना आणि दुर्गम प्रदेशाला शहरी भागाशी जोडण्यासाठी कार्य करते, असे जनरल रावत यांनी अभिमानाने सांगितले.

पाकड्यांना चेतावणी
सीमारेषेवर आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला लष्करप्रमुखांनी यावेळी सज्जड दम दिला. पाकिस्तानने सीमारेषेवर आगळीक थांबवली नाही तर हिंदुस्थानला आणखी कठोर पावले उचलावी लागतील. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानचे सर्वात जास्त नुकसान होत असल्याचेही जनरल रावत यांनी म्हटले. पाकड्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर देण्याचे आम्ही ठरवल्याचे जनरल रावत यांनी स्पष्ट केले.