…तर उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी अमेरिका सज्ज!: ट्रम्प

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

हिंदुस्थान-चीनला चर्चा करुन तणाव दूर करण्याचा सल्ला देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला युद्धाचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच युद्धाची भाषा सोशल नेटवर्कवरुन अध्यक्ष स्वतः करत आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर अमेरिकेला युद्धाची धमकी दिली आहे.

उत्तर कोरियाजवळच्या बेटावर अमेरिकेचा एक तळ आहे. हा तळ अवघ्या काही मिनिटांत नष्ट करू अशी भाषा उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग करत आहेत. वागणुकीत सुधारणा झाली नाही तर थेट अमेरिकेवर हल्ला करू असा आव त्यांनी आणला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्याला युद्ध सज्ज होण्यास सांगितले आहे. ट्वीट करुन ट्रम्प यांनी किम जाँग यांना शांततेचे पर्याय शोधण्यास सांगितले आहेत. उत्तर कोरियाने धमक्या देणे थांबवले नाही तर अमेरिका असा हल्ला करेल की जग बघत राहील असे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. उत्तर कोरिया त्यांच्याकडे असलेल्या लहान-मोठ्या अशा ६० अणुबॉम्बच्या जोरावर अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.