दह्यादुधाची रेलचेल

दह्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया रिकाम्या पोटात ऍसिडची मात्रा वाढवतात आणि त्यामुळे पोटात हमखास जळजळ होते.

मीना आंबेरकर

उद्या कृष्ण जन्म… कृष्ण म्हणजे दही… दूध… लोणी… पाहूया दह्यादुधातील पाककृती…

आज आपण मसालेदार सदरातून जरा हलके पदार्थ पहाणार आहोत. कारण आता गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे. गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी ही सर्व नावे आपल्याला एकाच गोष्टीकडे घेऊन जातात, तो म्हणजे गोपाळकाला. गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला हे समीकरणच बनलेले आहे. गोपाळकाला म्हणजे दह्यादुधाची रेलचेल… दह्यादुधाशिवाय गोपाळकाला पूर्णच होऊ शकणार नाही. दह्यालोण्याने स्वतःला माखवून घेत हंडी फोडण्यासाठी येणारे गोविंदा त्यादिवशी दह्यादुधाचा मस्त आस्वाद घेतात. तसा तो घेणे अपेक्षितच आहे. त्यामुळे आज आपण पहाणार आहोत दही, दूध, लोणी यांच्यापासून तयार झालेल्या काही खाद्य कृती…

tandoor-23

तंदुरी गोबी

साहित्य…2 मध्यम कोवळे फ्लॉवरचे गड्डे, 1 वाटी घट्ट दही, 2 चमचे आले-लसूण पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 2 मध्यम टोमॅटो, 1 चमचा लाल तिखट, अर्धी चमचा आमचूर, 1 चमचा अमूल बटर, 1 चमचा हळद, 1 वाटी वाफवलेले मटार, मीठ.

कृती…फ्लॉवरची मागची पाने व जून दांडा काढून गड्डेच अखंड ठेवा. ते स्वच्छ धुवून हळद-मिठाच्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवा. परत धुवून वेगळ्या हळद-मिठाच्या पाण्यात उकडा, अर्धे कच्चे शिजवून चाळणीवर निथळा, दह्यात बटर व मटार वगळता सारे जिन्नस घेऊन नीट फेटा. फ्लॉवर तुटणार नाही या बेताने खोलवर उभ्या चिरा पाडा व अमूल बटर आतून बाहेरून चोपडा, टोमॅटोची प्युरी करून घ्या व ती दह्यात मिसळा. दही गड्डय़ांमध्ये आतून बाहेरून भरून किंवा लावून मुरवत ठेवा, मटार घाला. गॅस तंदूर किंवा ओव्हनमध्ये (180 अंश सेल्सिअस 15-20 मिनिटे आलटून पालटून भाजा.)

pneer-kofta

पालक पनीर कोफ्ता करी

साहित्य…पालकाच्या 5 मोठय़ा जुडय़ा, 3 हिरव्या मिरच्या, 6 लसूण पाकळय़ा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 100 ग्रॅम पनीर, 1 चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, 2 कप टोमॅटो प्युरी, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे साखर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे साखर, अर्धा चमचा कसूरी मेथी, 1 वाटी साय, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तळायला तेल, 3 हिरव्या वेलच्या, 4 लवंगा, 1 तमालपत्र.

कृती….पालक निवडून धुवून बारीक चिरा व उकळत्या पाण्यात 5 ते 10 मिनिटे ठेवून परत गार पाण्यात घाला. थोडय़ा वेळाने पाणी पिळून काढा. या पालकात 1 हिरवी मिरची बारीक चिरून घाला. त्यात निम्मी आले लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर व मीठ घालून घट्ट मळा व त्याचे 12 गोळे करा. पनीर किसून त्यात मीठ घालून 12 गोळे करा. पालकाच्या गोळय़ांची पारी करून त्यात पनीरची गोळी घाला व पारी बंद करून गरम तेलात तळा. असे सर्व कोफ्ते करून घ्या. याच तेलातले 3 चमचे तेल घेऊन त्यात वेलची, लवंगा, तमालपत्र घालून नीट परता, उरलेल्या 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घाला. आले, लसूण गोळी परता. टोमॅटो प्युरी, तिखट, गरम मसाला, मीठ व 1 वाटी पाणी घालून उकळी काढा व मंद कोफ्ते सोडा व गॅस बंद करा.

khoya-mutter

खोया मटर

साहित्य….अडीच कप मटर, 3 लवंगा, 1 चमचा हिंग, दीड कप किसलेला खवा, 3 मोठे चिरलेले टोमॅटो, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दीड चमचा धणे पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा इंच आले किसून, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे तूप, मीठ, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर सोडा.

कृती…मटर धुवून किंचित सोडा व थोडे मीठ पाण्यात घालून वाफवून घ्या व निथळत ठेवा. पातेल्यात तूप तापले की हिंगाची फोडणी करा. खवा खमंग परतून घ्या. टोमॅटो, मीठ, मिरच्या घालून आणखी परता. मटार व कोथिंबीर वगळता सारे जिन्नस मिसळा. 1 वाटी पाणी घाला. 1 ते 2 दणदणीत वाफा आणा. मटार घालून 2 ते 3 मिनिटे शिजवा. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.