मिनर्व्हा पंजाब चॅम्पियन

सामना ऑनलाईन । पंचकुला

विल्यम ओपोकुने १६व्या मिनिटाला केलेल्या दमदार गोलच्या जोरावर मिनर्व्हा पंजाबने गुरुवारी झालेल्या लढतीत चर्चिल ब्रदर्सला १-० अशा फरकाने पराभूत केले आणि आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली.

हिंदुस्थानातील फुटबॉलच्या प्रसार व प्रचाराच्या दृष्टीने गेली दोन वर्षे आनंददायी ठरलीय. गेल्या वर्षी एजॉल संघाने आय लीग स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली होती. आणि आता मिनर्व्हा पंजाबने फुटबॉलच्या रणांगणात शानदार खेळ करीत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केलाय. दोन्ही संघ कमकुवत समजले जात असतानाच त्यांनी सर्वस्व पणाला लावत कामगिरी केली आणि बलाढय़ संघांना मागे टाकत नंबर वन स्थानावर झेप घेतली. चंदिगडच्या मिनर्व्हा पंजाबने १८ सामन्यांमधून ३५ गुणांची कमाई करीत उत्तुंग झेप घेतली. याआधी पंजाबच्या जेसीटी संघाने १९९६-९७ साली आय लीग स्पर्धा जिंकली होती.