चांदवडजवळ भीषण अपघातात दहा ठार; पंधरा जखमी

सामना प्रतिनिधी । नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडजवळील सोग्रस येथे गुरुवारी पहाटे मिनी ट्रव्हलर बस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात दहाजणांचा जागीच मृत्यू झाला, तर पंधरा प्रवाशी जखमी झाले, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात व सुयश या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण येथील पंचवीसजण मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, उज्जैन येथे मिनी बसने देवदर्शनासाठी गेले होते. ते मालेगावमार्गे नाशिककडे येत असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड टोलनाक्याच्या पुढे सोग्रस गावाजवळ आडगाव टप्पा येथे अचानक चालकाच्या बाजूचे टायर फुटले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, समोर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर जावून ही बस धडकली आणि हा भीषण अपघात झाला.

चांदवड पोलिसांत अपघाताची नोंद
यात कल्याणचेच पालू छगन बेरडीया, धनू मधुकर परमार, राधा तुलसी राठोड, विजय राजेश वलोदरा, अजय मल्होत्रा, जमुना गोविंद चव्हाण, गीता कैलास वलोदरा, जातू दुधानिया (४५), मंजू सुनील गुजराथी, कशीश प्रकाश चव्हाण, छाया मधुकर परमार, प्रतिज्ञा सुधीर गुजराथी (९), प्रगती सुनील गुजराथी (१२), क्लिनर पूनम गोंडाजी माळी (२६) हे जखमी झाले आहेत. यातील चौघांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात, तर नऊ जखमींवर सुयश या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिनी बसचा चालक उल्हासनगर येथील संतोष किसन पिठले यांनी दिलेल्या माहितीवरून चांदवड पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

मृतांची नावे
मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. कल्याण येथील किसन बाबा चव्हाण (५८), लक्ष्मीबाई नानजी परमार (६५), काऊ छगन चव्हाण (४८), जागृती प्रकाश घावरी (३५), गुंजन अजय वलोदरा (२४), पवन प्रकाश घावरी (७), निशा प्रकाश घावरी (१६), गीता नरेश परमार (४५), प्रकाश सन्ना घावरी (३५), गीता मोहन परमार (४०) अशी या मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.