जेव्हा राज्यमंत्री गुलाबराव पाटील एसटीने प्रवास करतात…

भरत काळे । जळगाव

नेहमीच सर्व सामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे, सर्व सामान्यांना आपलेसे वाटणारे राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी चक्क एसटी बसने प्रवास केला. राज्यमंत्री पाटील यांच्या या साधेपणाची जिल्ह्यात एकच चर्चा होत आहे. सामान्य प्रवाशांसोबत प्रवास करुन त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पाळधी ते जळगाव असा प्रवास करून सामान्य प्रवासी, विद्यार्थी, चालक- वाहक यांच्या समस्या जाणून घेतल्या. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांच्या या प्रवासामुळे त्यांची जनसामान्यांसोबत नात्याची वीण अजून घट्ट झाली आहे.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणजे रांगडा माणूस. मात्र शेतकरी आणि सामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना कधी हळवे तर प्रसंगी आक्रमक बाणा दाखवणारा त्यांचा स्वभाव. जनतेत मिसळल्याशिवाय त्यांच्या समस्यांची जाण होत नाही, हे जाणून असलेल्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाळधी ते जळगाव पर्यंत एसटीच्या लाल परीने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी-लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. प्रवासादरम्यान एसटी बसच्या संबंधित नागरिकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले. बसस्थानकावर आल्यानंतर वाहतूक नियंत्रक, चालक – वाहक यांच्याशीही पाटील यांनी संवाद साधला.

दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘सामान्य प्रवासी, विद्यार्थी यांच्या समस्यांची जाण व्हावी यासाठीच हा प्रवास केला आहे.’ पास शुल्क कमी व्हावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. एसटी बस मधील तसेच बसस्थानकावरील स्वच्छतेची माहिती या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.