भाजपमध्ये हिंमत असेल तर सरकारमधून मला हाकलावे, मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे आव्हान

omprakash rajbhar

सामना ऑनलाईन । लखनौ

भाजपमध्ये हिंमत असेल तर उत्तर प्रदेशच्या सरकारमधून मला हाकलून दाखवाच असे खुले आव्हान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि मागासवर्ग कल्याणमंत्री ओमप्रकाश राजभर यांनी दिले. ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

मित्रपक्षाला बेदखल करून टाकण्याच्या भाजपच्या धोरणाविरोधात ओमप्रकाश राजभर हे गेले काही दिवस सतत लढत आहेत, मात्र आपल्याला मंत्रिमंडळातून हाकलून दाखवाच असे खुले आव्हान त्यांनी योगी आदित्यनाथ यांना पहिल्यांदाच दिले आहे.

भाजपने आपल्या पक्षाशी असलेली युती तोडून टाकली तरी त्याची आपणास अजिबात पर्वा नाही असे सांगून ते म्हणाले की, भाजपला वाटत असल्यास आपणास ते कधीही योगी सरकारमधून हाकलण्यास मोकळे आहेत, पण तेवढे धैर्य त्यांच्यात नाहीच. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फक्त भाजपच्याच मंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेत असून आपल्या पक्षाकडे साफ दुर्लक्ष करत आहेत असा आरोप राजभर यांनी केला. भाजप ‘आघाडी’चा धर्म पाळत नसून राजकीय मैत्रीच्या जबाबदाऱया टाळत आहे असे ते म्हणाले.

भाजप सरकारविरोधात नोव्हेंबरपासून आंदोलन
ओबीसींच्या कोटय़ातून अतिमागासांना आरक्षण देण्याचे योगी सरकार टाळत आहे. हा प्रश्न ऑक्टोबरपर्यंत सोडवला गेला नाही तर नोव्हेंबरपासून आपल्या पक्षाचे भाजप सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू होईल असा इशाराही ओमप्रकाश राजभर यांनी मेळाव्यातून दिला आहे.