जोगेश्वरीत अद्ययावत क्रिकेट स्टेडियम उभारा, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

13


सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते, परंतु खासकरून पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भूखंडावर अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे अशी विनंती आमदार, उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

पश्चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत, परंतु जोगेश्वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरिता अद्ययावत स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडा नैपुण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड अद्ययावत क्रिकेट स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करून आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर स्टेडियम उभारण्यासाठी अर्थसंकल्पात रुपये 50 कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या