अल्पवयीन मुलीने केला दोन वर्षीय चिमुरडीचा खून, मृतदेह लपवला माळ्यावर

1

सामना प्रतिनिधी । मुरबाड प्रतिनीधी

एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीने शेजारच्याच दोन वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केली आहे. मुरबाडमधील ही घटना असून शनिवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी रात्रीच या मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलीचे नाव मनिष्का असून आरोपी मुलीचे नाव निकीता आहे.

मुरबाड तालुक्यातील तुळई या गावातील मनिष्का जाधव ही दोन वर्षीय मुलगी काल दुपारपासून आपल्या घरातून बेपत्ता झाली होती.  शोधाशोध घेऊनही ती न भेटल्याने मुलीचे पालकांनी मुरबाड पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना प्रकरण संवेदनशील वाटल्याने त्यांनी तत्काळ रात्रीच या गावात जाऊन शोध घेऊन तपास सुरू केला. तेव्हा मनिष्काचा मृतदेह त्यांच्याच शेजारी राहाणाऱ्या निकिता जाधव हिने आपल्याच घराच्या माळ्यावर लपवून ठेवल्याची माहिती दिली.

धक्कादायक म्हणजे निकिता व मृत चिमुरडी ह्या जवळच्या नातेवाईक आहेत. पोलिसांनी रात्रीच निकीता व तिच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलीसांना अधिक तपासाबाबत सूचना केल्या. या बाबत अधिक तपास सुरू असून या हत्येमागील कारण स्पष्ट झाले नाही.