मराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय युवतीची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नगर  

चांगले गुण मिळवूनही अनूदानीत तुकडीत प्रवेश मिळाला नाही, केवळ मराठा समाजात जन्माला आल्याने आपल्यावर ही वेळ का आली? असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी नगर येथील 16 वर्षीय विद्यार्थिनीने वस्तीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे  एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधाबाई काळे महाविद्यालयात 11 वीत शिकत असलेली किशोरी बबन काकडे वय 1६ असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नावं आहे. आत्महत्या पुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा अरक्षणासाठी माझे बलिदान देत असल्याचे तिने म्हंटले आहे.

किशोरी हीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मला दहावीत 89 टक्के गुण मिळून अनुदानीत तुकडीत प्रवेश मिळू शकलेला नाही. चांगले गुण असुनसुध्दा ही विनाअनुदानीत तुकडी प्रवेश घ्यावा लागला त्यासाठी मला 8 हजार रुपये भरावे लागले. उलट ज्यांना 76 टक्के गुण आहे अशांना केवळ 1 हजार रुपयांत अनुदानीत तुकडीमध्ये प्रवेश दिला गेला. केवळ मराठा समाजात जन्माला आल्याने ही वेळ आली आहे. मराठ्यांचा महाराष्ट्र असून ही मराठ्यांवर वेळ आली त्यामुळे मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे असल्याचे चिट्टीत तिने नमूद केले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केलेली आहे. आईवडलांच्या अपेक्षा आपण पुर्ण करु शकत नाही असेही चिठ्ठीत तिने म्हटले आहे.

किशोरी काकडे ही नगर तालुक्यातील कापुरवाडी येथे राहणारी आहे. तीन महिन्यापूर्वी राधाबाई काळे महाविद्यालयात 11 वीसाठी विज्ञान विभागात तिने प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या वसतीगृहात ती राहत होती. सोमवारी ती लेक्चर अर्धवट सोडून हॉस्टेलच्या रुममध्ये आली तिथेच तिच्या मैत्रीणीसुध्दा उपस्थित होत्या. त्या गेल्यानंतर तिने महाविद्यालयातील वसतीगृहाच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती तोफखाना पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन या ठिकाणी त्यांना लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.