मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलीवर पाच जणांनी दोन महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या मुलीचा जबरदस्तीने गर्भपात केल्यानंतर तिच्या पालकांना तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन जण अद्याप फरार आहेत.

पीडित मुलगी ही जबलपूरमधील झोपडपट्टीत आई वडील व भावासोबत राहते. तिचे आई वडील व भाऊ हे एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत. त्यामुळे दिवसभर घरात ती एकटीच असायची. याचाच फायदा घेऊन सौरभ चक्रवर्ती आणि प्रमोद चक्रवर्ती या दोन भावांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने घडलेली घटना कुणालाही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवू अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुणालाही हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर काही दिवसांनी सौरभ व प्रमोद पीडितेला घेऊन त्यांच्या घरी गेले. तेथे त्यांचे आणखी दोन भाऊ हनी आणि राहुल चक्रवर्ती यांनी तिच्यावर बलात्कार केला. गेले दोन महिने हे चारही भाऊ आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करत होते. दरम्यान या चौघांव्यतिरिक्त राहुलचा मित्र बंटू सोनकर याने देखील तिच्यावर बलात्कार केले. बलात्कारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. यामुळे आपले प्रकरण उघडकीस येईल म्हणून या पाच जणांनी तिचा जबरदस्ती गर्भपात केला. त्यानंतर पोटात दुखू लागले व रक्तस्त्राव होऊ लागल्याने मुलीने याबाबत आई वडिलांना सांगितले.

याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी हनी, सौरभ व प्रमोदला अटक केली असून राहुल व बंटू अद्याप फरार आहेत. पीडित मुलीला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जबलपूरचे पोलीस निरीक्षक अर्जुन उईके यांनी दिली आहे.