मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम गजाआड

सामना प्रतिनिधी । पनवेल

माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. समवयस्क मित्राच्याच अल्पवयीन मुलीला फूस लावून तीच्यावर मातृत्व लादणाऱ्या ४९ वर्षीय नराधमाला पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हा नराधम २२ वर्ष कुवैत येथे नोकरी करीत होता. चार वर्षांपूर्वीच तो पनवेलमध्ये स्थायिक झाला होता. त्याचे लग्न झालेले असून त्याला १५ वर्षांची मुलगीदेखील आहे. परंतु, पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने दोघेही वेगळे राहतात. नराधमाची मुलगी तिच्या आईसोबत माझगाव (मुंबई) येथे राहते. पनवेलमध्ये तो एकटाच राहत होता. दरम्यान, पनवेलमधीलच मित्राच्या घरी त्याचे येणे- जाणे सुरू होते. त्यावेळी मित्राच्याच दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीबरोबर त्याने ओळख करून घेत मैत्रीचे संबंध निर्माण केले. हळू हळू मैत्रिला प्रेमाचा रंग आला. २२ जुलै २०१७ ला दोघांनी लग्नही केले. लग्नानंतर दोघेही आपापल्या घरी राहत असल्याने कुणालाही संशय आला नाही.

२७ सप्टेंबरला दोघांनी पनवेल सोडले आणि दोघांच्याही मोबाईलमधील सिमकार्ड फेकून दिले. मुलगी घरी आली नाही. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध केली. परंतु तिचा पत्ता लागला नाही. त्याचवेळी हा नराधमही घरी येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच्यावरील संशयाने पनवेल शहर पोलिसांनी २८ सप्टेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या तपासात दोघेही तळोजा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना तळोजा येथून अटक केली. दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात अपहरणाबरोबरच बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.