अल्पवयीन बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील एका अल्पवयीन बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मुलगी किशोरी हायस्कूलमध्ये शिकत होती. १५ डिसेंबर २०१८ रोजी एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्यावर कारवाई करत तरुणाला अटक केली होती.

त्यानंतर आरोपी तरुणाच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या कुटुबीयांना आरोप मागे घेण्यास धमकावले. तसे न केल्यास मुलीला जिवंत जाळण्याची धमकीही दिली होती. या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुबीयांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपीच्या कुटुबीयांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.