धक्कादायक! १५ वर्षाच्या मुलाने केला ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतानाच दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १५ वर्षाच्या मुलाने ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पीडित महिलेने दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ मुलाने बलात्कार केल्याची तक्रार केली आहे.

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिला अंघोळ करत असताना दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ आरोपी थांबला होता. आजूबाजूला कोणीही नसल्याने त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मुलाने जबरदस्ती केली. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला असता मुलाने रागाच्या भरात तिला मारहाण केली. तसेच याबाबत कोणालाही सांगू नको, असे धमकी देऊन तो पसार झाला. त्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक पथक नेमलं होतं. त्यानुसार पथकाने आरोपीला अटक केली आहे. आरोपीची चौकशी केल्यावर त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्याच पोलिसांनी म्हटलं आहे.