मालवण शहरातून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण धुरीवाडा येथे शिक्षणानिमित्त राहत असलेला हर्षल निलेश पणदुरकर (१३) तारकर्ली-देवबाग हा विद्यार्थी बुधवार ३१ पासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोपीवाला हायस्कुल येथे आठवी वर्गात शिक्षण घेत असलेला हर्षल शिक्षणानिमित्त धुरीवाडा येथील आपल्या मावशीकडे रहात होता. बुधवारी सकाळी घरातून निघाला तो परत आलाच नाही. तो शाळेतही न गेल्याची माहिती समोर आली. बुधवार सायंकाळ पासून हर्षल याचा शोध वडील निलेश, काका सदा व आनंद यांच्यासह रमेश कद्रेकर, योगेश सारंग, नाना तांडेल, मकरंद चोपडेकर, आशिष केळुसकर यांच्याकडून सुरू होता.

बुधवारी रात्री नातेवाईकांनी मालवण पोलीस ठाण्यात धाव घेत हर्षल बेपत्ता असल्याची माहिती दिली. व शहरातील बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेतून हर्षल याचा शोध घेण्याची मागणी केली. मात्र सिसिटीव्ही यंत्रणा बंद असल्याने नातेवाईकांनी स्वतःहून शोध मोहीम सुरू केली. पोलीस यंत्रणेने हर्षल याचे घरातील दप्तर तपासले असता त्यात मी कोल्हापूर येथे स्वतःच्या नोकरीला जात असल्याची चिट्ठी सापडली आहे.

पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा
हर्षल बेपत्ता असल्याची माहिती वडील निलेश यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली. हर्षल हा अल्पवयीन असल्याने त्याच्या बेपत्ता प्रकरणी पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कणकवली रेल्वे स्थानकात सायकल
हर्षल याचे नातेवाईक शोध घेत कणकवलीत पोहचले असता रेल्वे स्थानकात हर्षल याची सायकल दिसून आली. तर बुधवारी दुपारी तुतारी एक्सप्रेस मधून हर्षल मुंबईच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.