वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

सामना प्रतिनिधी । भाईंदर

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या दणक्यानंतर ताळ्यावर आलेल्या मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने शिवसेनेसमोर आज नमते घेतले. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या केल्या जातील, अशी लेखी हमीच प्रशासनाने शिवसेनेला दिली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. पालिकेच्या आश्वासनानंतर शिवसेनेने सलग सातव्या दिवसानंतर आपले आंदोलन मागे घेतले.

भाईंदर महापालिकेत भाजपची सत्ता असून आमदार नरेंद्र मेहता यांच्या आशीर्वादाने अनेक अधिकारी एकाच विभगात वर्षानुवर्षे काम करीत आहेत. त्यामुळे पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून सर्वसामान्यांची कामे वेळेत होतच नाहीत. या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी पालिका मुख्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. मात्र त्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला ताळ्यावर आणण्यासाठी बुधवारी शिवसैनिकांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांची गाडीच अडवत त्यांना जाब विचारला. शिवसेनेच्या दणक्याने सुतासारखे सरळ झालेल्या प्रशासनाने लेखी आश्वासन देत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे वचन दिले. त्यामुळे शिवसेनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे.

पालकमंत्र्यांनी घेतली दखल
या आंदोलनाची दखल घेत शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे विचारणा केली. तसेच भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालू नका, आंदोलन कुणाचेही असो त्याची दखल घ्या, अशा सूचना केल्या. त्यामुळे प्रशासनाने लागलीच लेखी हमी देत अधिकाऱ्यांच्या बदल्या अथवा भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे सांगितले.

…तर यापुढेही रस्त्यावर उतरू!
मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, अशी हमी प्रशासनाने दिली आहे. हा आमच्या आंदोलनाचा विजयच आहे. यापुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांनी सांगितले. या आंदोलनात शहरप्रमुख प्रशांत पालांडे, नगरसेवक धनेश पाटील, संदीप पाटील, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, आनंद शिर्के, जयंतीलाल पाटील, तारा घरत, दीप्ती भट, विभागप्रमुख विलास सूर्यवंशी, शाखाप्रमुख नरेंद्र उपरकर सहभागी झाले होते.