विक्रोळीवासीयांच्या जिभेवर झणझणीत मिसळीची चव!

सामना प्रतिनिधी । मुंबई 

गरमागरम लालभडक रस्सा, त्यावर भुरभुरलेली शेव, फरसाण आणि त्याच्या जोडीला ठेवलेली लिंबाची फोड, कांदा अशा झणझणीत मिसळीची चव सध्या विक्रोळी परिसरातील नागरिक चाखत आहेत. निमित्त आहे शिवसेना शाखा क्र. १११, ११७ आणि श्रीमान योगी प्रतिष्ठान यांनी कांजूर पूर्व येथे आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवाचे. या मराठमोळय़ा मिसळ महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी शिवसेना नेते अॅड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले.

शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने कांजूर पूर्व येथील गोल्डन पॅलेसजवळ सुरू केलेल्या या मराठमोळय़ा मिसळ महोत्सवाला विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मिसळीची चव चाखण्यासाठी सर्वच स्टॉलवर मोठी गर्दी होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुनील राऊत, मराठी सिने अभिनेते संतोष जुवेकर, सुशांत शेलार यांच्यासह महिला विभाग संघटक संध्या वढावकर, उपविभाग संघटक सिद्धी जाधव, नगरसेविका सुवर्णा करंजे, नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख बाबू ठाकूर, चंद्रशेखर जाधव, विधानसभा संघटक भारती शिंगटे, शाखा संघटक प्रतिभा राणे आदी उपस्थित होते. हा मिसळ महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख प्रभू गवस, दीपक सावंत, माजी शाखाप्रमुख अनंत पाताडे मेहनत घेत आहेत.

आज गर्दी उसळणार

तीन दिवस चालणाऱया या मराठमोळय़ा मिसळ महोत्सवाचा रविवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे झणझणीत मिसळीची चव चाखण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी उसळणार आहे.