सहजच डायल केला..

>>आशीष बनसोडे

हॅलो… दादर स्थानकातून सुटलेल्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवलाय… एवढे बोलून कॉलरने फोन ठेवला. आरपीएफच्या १८२ या हेल्पलाइनवर हा निनावी कॉल आल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या. आरपीएफचे जवान, जीआरपी तसेच बॉम्ब स्कॉडने कल्याण स्थानकात अख्खी चेन्नई एक्स्प्रेस तपासली. अखेर कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आणि एक्स्प्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण पोलिसांचे काम सुरू झाले. हेल्पलाइनवर आलेल्या मोबाईल नंबरवरून पोलिसांनी त्या कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली. कसून तपासांती तो सापडला आणि त्याने गुह्याची कबुलीसुद्धा दिली. मात्र बॉम्ब ठेवल्याचा कॉल का केला याचे उत्तर जेव्हा त्याने दिले ते ऐकून पोलीसही चक्रावले.

११ तारखेच्या सायंकाळी पोलिसांना निनावी कॉल आला आणि चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले होते. या निनावी कॉलमुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. शिवाय प्रवाशांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने त्या निनावी कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या नंबरवरील सीडीआरचा अभ्यास केल्यानंतर तो मोबाईल नंबर सुहास देशमुख या वृद्धाचा असून त्यांचा ठाण्यात कारपेटचा व्यवसाय असल्याचे समोर आले. पोलिसांनी लागलीच ठाणे गाठून सुहास देशमुख यांच्या दुकानावर धडक दिली. तुम्ही चेन्नई एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल का केला या आणि अनेक प्रश्नांचा भडिमार पोलिसांनी सुरू केला. पण अचानक दुकानात आलेले पोलीस आणि त्यांनी सुरू केलेला प्रश्नांचा मारा यामुळे देशमुख चक्रावले. पोलिसांनी त्यांना मोबाईल नंबरबाबत विचारल्यावर निनावी कॉल प्रकरणाचा जवळपास पर्दाफाश झाला. आरपीएफच्या हेल्पलाइनवर चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल ज्या मोबाईल नंबरहून आला होता तो नंबर देशमुख यांच्याकडे काम करणाऱया अजय चौबे हा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱयाच दिवशी देशमुख यांनी अजयला पोलिसांच्या समोर हजर केले. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर अजय पोपटासारखा बोलू लागला.

साहेब मी नाही ‘नशा’ बोलली…
साहेब… मीच त्या दिवशी बॉम्ब ठेवल्याचा कॉल केला होता. पण कोणाला त्रास द्यायचा माझा हेतू नव्हता. रागाच्या भावनेतूनसुद्धा मी तसे केले नाही. त्या दिवशी मी खूप दारू प्यायलो होतो. दारूच्या नशेत ट्रेनमधून जाताना समोर आरपीएफचा हेल्पलाइन नंबर दिसला. त्यामुळे सहज त्यावर फोन करून चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचे बोललो अशी कबुली तो देऊ लागला. दारूच्या नशेत अजयने मोठी घोडचूक केलीच, मात्र त्याच्यासोबत त्याचा मालक सुहास देशमुख यांना नाहक मनस्ताप झाला. कारण अजयने ज्या नंबरवरून कॉल होता तो नंबर जरी अजय वापरत असला तरी ते सीमकार्ड सुहास यांच्या नावचे होते. त्यासाठी लागणारे कागदपत्र सुहास यांचे होते. मात्र पोलीस चौकशीत सर्व बाबी स्पष्ट झाल्या आणि दारूच्या नशेत बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारा अजय गजाआड झाला.