मराठमोळ्या पीळदार सौंदर्यवतींमध्ये पोझयुद्ध

सामना ऑनलाईन, मुंबई

‘मुंबई श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार उद्यापासून तमाम क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. हिंदुस्थानी शरीरसौष्ठवात सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेत फिजिक स्पोर्टस् प्रकारात म्हणजेच ‘मिस मुंबई’साठी तब्बल पाच पीळदार सौंदर्यवतींनी आपला सहभाग नोंदविला असून यात दोन मराठमोळ्या महिलांचाही समावेश आहे. तसेच प्रदर्शनीय होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आमला ब्रह्मचारी आणि श्रद्धा डोके या मराठमोळ्या कन्या आपल्या सौष्ठवाचे प्रदर्शन करतील.

परळ रेल्वे वर्कशॉपच्या मैदानात होणारा मुंबई फिटनेस सोहळा ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरणार आहे. खेळाडूंना श्रीमंत करणाऱ्या स्पर्धेत शरीरसौष्ठवालाही नवी झळाळी देण्याचा प्रयत्न आरोग्य प्रतिष्ठानने केला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कुडाळकर यांनी दिली. आठ लाखांची रोख बक्षिसे आणि सर्वांना आपल्या प्रेमात पाडणारा भव्यदिव्य चषक हेच यंदाच्या ‘मुंबई श्री’चे आकर्षण असले तरी ‘मिस मुंबई’ स्पर्धासुद्धा आकर्षक होणार असल्याचे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी सांगितले. शनिवारी स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून रविवारी अंतिम फेरीचा थरार रंगेल.