धक्कादायक! पत्नी व प्रियकराने केली ‘हरवलेल्या’ पतीची निर्घृण हत्या

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईमध्ये हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून हरवलेल्या पतीची हत्या केली आहे. अनिल कुमार रावत (32) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ममता रावत आणि सोनू (22) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल कुमार रावत हा पालघर येथील एका कंपनीत सुपरवायझरचे काम करत होता. अनिलची पत्नी ममता हिने 15 फेब्रुवारीला तो दोन दिवसांपासून घरी आला असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. याच दरम्यान भोईसर येथील जंगलामध्ये एक मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेहाची अवस्था खराब असल्याने तो नक्की कोणाचा याचा शोध घेणे अवघड होते. परंतु काही दिवसांपूर्वी अनिलच्या पत्नीने तो हरवला असल्याची तक्रार दिली असल्याने पोलिसांनी तिला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले. यावेळी ममताने हा आपला पतीच असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला.

ममता व सोनूवरील संशय बळावला…
हत्येप्रकरणी पोलिसांना अनिलची पत्नी ममता हिच्यावर दाट संशय होता. तसेच गेल्या काही महिन्यांपासून अनिलच्या घरी राहण्यासाठी आलेल्या सोनू याच्यावरही पोलिसांना संशय होता. सोनू हा अनिलचा लांबचा नातेवाईक असल्याने तो तीन महिन्यांपासून त्यांच्या घरी राहण्यास आला होता. याच दरम्यान ममता आणि त्याच्यामध्ये जवळीकता आली होती. अनैतिक संबंधास पतीचा अडथळा येत असल्याने दोघांनीही त्याच्या हत्येचा कट रचला.

निर्घृण हत्या आणि मृतदेहाची विटंबना
पत्नीचे सोनूसोबत असलेल्या संबंधांची खबर लागल्यानंतर अनिल आणि ममतामध्ये 13 फेब्रुवारीला सोनूसमोर जोरदार भांडण झाले. याचवेळी सोनू आणि अनिलमध्ये झटापट झाली. सोनूने या दरम्यान अनिलच्या डोक्यामध्ये वजनदार वस्तू मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रात्री सोनूने मृतदेह खांद्यावर नेऊन जंगलात फेकला आणि ओळखू येऊ नये म्हणून त्याची विटंबना केली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केल्याने या हरवलेल्या व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघड झाला.