स्टार्कचा अचाट विक्रम, एकाच सामन्यात दोनदा हॅटट्रिक

सामना ऑनलाईन । सिडनी

क्रिकेटमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान ज्याप्रमाणे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला तुल्यबळ प्रतिस्पर्धी समजले जाते. दोन्ही संघांमधील अॅशेस मालिकेला महत्त्वाचे स्थान आहे. अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या प्रदर्शनामुळे इंग्लंडच्या संघाला धडकी भरली आहे. स्टार्कने एकाच सामन्यात दोनदा हॅटट्रिक घेत इंग्लंडच्या फलंदाजांना सावधतेचा इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत सामन्यात शेफील्ड शील्डमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना स्टार्कने हा पराक्रम केला.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना स्टार्कने सोमवारी हॅटट्रिकची नोंद केली होती. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या डावातही स्टार्कने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत पुन्हा हॅटट्रिकची नोंद केली. स्टार्कच्या तुफानी गोलंदाजीच्या बळावर साऊथ वेल्सने वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर १७१ धावांनी विजय मिळवला.

एका सामन्यात दोनदा हॅटट्रिकची पहिली वेळ

शेफील्ड शील्डच्या इतिहासात एकाच सामन्यात दोनदा हॅटट्रिक घेण्याची ही पहिली वेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात दोन हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज टीजे मॅथ्यूज यांच्या नावावर आहे. १९१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांनी असा पराक्रम केला होता.