‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज! ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक धावा

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मितालीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सहा हजार धावांचा टप्पा गाठणारी ती पहिली महिला क्रिकेट खेळाडू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा यांना टी-20 क्रिकेटविश्वात धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जात असले तरी या दिग्गजांना हिंदुस्थानी महिला क्रिकेटर मिताली राज हिने सर्वाधिक धावांच्या बाबतीत मागे टाकले आहे. महिला क्रिकेट टीममधील ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मितालीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2283 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माच्या खात्यात 2207 धावा आहेत. इतकेच नाही तर रोहितइतकेच 80 डाव खेळूनही मितालीने त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

मिताली राजने महिला वर्ल्ड टी-20 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 56 धावांची खेळी करून रोहितलाही मागे टाकले. महिला क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक धावांच्या बाबतीत मिताली जगात चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडची सूजी बेटस् (2996) ही पहिल्या, वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर (2691) दुसऱ्या स्थानी आणि इंग्लंडची एडवर्ड (2605) तिसऱ्या स्थानी आहे.