सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । सातारा

भाजप सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह समविचारी पक्षांनी पुकारलेल्या हिंदुस्थान बंदला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात बंदला चांगलाच पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

पेट्रोल व डिझेलच्या वारेमाप दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून वाढत्या महागाईने लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. भाजप सरकार कोणत्याही बाबतीत सामान्य जनतेला दिलासा देऊ न शकल्याने जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व समविचारी पक्षांनी आजच्या बंदची हाक दिली होती. बंदच्या आवाहनामुळे अनेक व्यावसायिकांनी सकाळी दुकाने न उघडणेच पसंत केले. गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे काहीजण सकाळपासून परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत होते. बंद करण्यास सांगायला कोणी येते की नाही ते पाहून काहींनी सुरूवातीला दुकाने अर्धवट उघडली. नंतर पूर्ण उघडली. कित्येक व्यावसायिकांनी मात्र दुकाने बंदच ठेवली.

शहराच्या उपनगरात बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळला गेल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प राहिले. ग्रामीण भागात वडाप वाहतुकही बंद राहिल्याने रस्ते ओस पडले होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची गैरसोय झाली. बंदमुळे सातारा शहरातील बसवाहतुक सकाळी रोडावली होती. अनेक शाळा – कॉलेजनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्कूल बसेस बाहेर सोडल्या नव्हत्या. त्यामुळे शाळेतील उपस्थिती अत्यल्प होती. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच शहरात जागोजागी, चौकाचौकात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.