आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षकांमध्ये खडाजंगी

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि पोलीस निरीक्षक विक्रम साळोखे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरातील अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला. पोलिसांनी दांडेलशाहीने दुकाने हटविल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केल्याने भालके शहनिशा करण्यासाठी गेले असता साळोखे यांनी भालके यांच्याशी असभ्य वर्तन केले. तेंव्हा संतप्त झालेल्या भालके यांनी साळोखे यांची चांगलीच कानउघाडणी केली.

पोलीस निरीक्षक साळोखे यांची मंदिर सुरक्षेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी काही दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार घेतल्यानंतर साळोखे यांनी मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली. यामध्ये रस्त्यांवर बसून हारफुले, चुडे, माळा आदी वस्तू विकणार्‍यां किरकोळ विक्रेत्यांना बसण्यास त्यांनी मनाई केली. ही कारवाई करताना एका ऐशी वर्षांच्या महिलेच्या हातावर काठी मारुन विक्रीचे साहित्य उधळून दिल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला. या जुलमी कारवाईमुळे भयभीत झालेल्या महिला व्यापाऱ्यांनी आमदार भालके यांच्या कानावर ही बाब घातली. या घटनेची शहानिशा करण्यासाठी भालके गुरुवारी मंदिर परिसरात गेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून माहिती घेत असताना साळोखे हजर झाले आणि कारवाईचे समर्थन करीत साळोखे यांनी आमदार भालके यांच्यासमोर एका वयोवृद्ध महिलेला असभ्य भाषेत सुनावले.

आपण दम देत असलेल्या महिलेचे वय आपल्या आईच्या वयाइतके आहे, त्यांच्याशी सभ्यतेने बोला असे भालके यांनी साळोखे यांना सांगितले. मात्र, साळोखे यांनी आपला पोलिसी खाक्या सोडला नाही. शर्टची बटणे उघडी ठेवून आणि डोक्यावर टोपी न घालता लोकप्रतिनिधीशी बोलत आहात हे भालके यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही साळोखे यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. तेव्हा उपस्थित असलेले भालके समर्थक आणि शंभरहून अधिक व्यापारी साळोखेच्या असभ्य वर्तनावर संतप्त झाले. दोघांमध्ये तू तू मैं मैं इतकी वाढली की प्रकरण हातघाईवर आले. शेवटी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी भालके यांना शांत करुन त्यांना बाजूला नेले.

अतिक्रमण कारवाई करा, पण सबुरीने…
पंढरपूर हे वारीवर जगणारे गाव आहे. छोटे मोठे व्यवसाय करुन लोक पोट भरतात. वाहतुकीला अडचण येत असेल तर त्यांना पर्यायी जागा द्या. पण त्यांच्या उदरनिर्वाहवर गदा आणू नका. गरीब व्यापारी आहेत. हातावरचे पोट आहे. त्यांना मारहाण करु नका, मालाचे नुकसान करु नका अशी विनंती आपण पोलीस अधिकाऱ्यांना केली. पण साळोखे असभ्य भाषेत बोलत होते. त्यांचे वर्तन आपण वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याचे भालके यांनी स्पष्ट केले.