जायकवाडीतून माजलगाव प्रकल्पात 2 टीएमसी पाणी सोडा- जयदत्त क्षीरसागर

jaydutt-khirsagar

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यात दुष्काळ भीषण स्वरूपात आहे, सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यातच शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो, मात्र त्यातही पाणी मुबलक नाही. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातुन माजलगाव धरणात 2 टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

माजलगाव धरणात 84 एम.एम.क्यू. म्हणजेच 2.96 टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक असून यात रोज सदरील पाणी साठ्यातून प्रति दिनी 12 एमएम म्हणजेच 223 एम.एम.क्यू. पाण्याचे बाष्पीभवन होते. या धरणावरून माजलगाव शहर व बीड शहर या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा होत असून हा सध्याचा पाणीसाठा पाहता पाऊस पडेपर्यंत हा पाणीसाठा पुरणार नाही. माजलगाव शहराची लोकसंख्या व बीड शहराची लोकसंख्या पाहता व लागणारे पाणी या करीता जायकवाडी प्रकल्पातून पैठण येथील उजव्या कालव्यातून 2 टीएमसी पाणी सोडण्यात यावे जेणेकरून माजलगाव धरणात 1 टीएमसी पाणी पोहचेल व या दोन शहरांना पाऊस पडेपर्यंत पाणी पुरेल. सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तातडीने जायकवाडी प्रकल्पातून 2 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश संबंधीत विभागाला देण्यात यावेत अशी मागणी जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.