वाहन कर्जाला व्याजदर कमी, शैक्षणिक कर्जाला जास्त का? विद्यार्थ्यांनी घेतली आमदारांची शाळा

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

बँकांकडून वाहन कर्जाला व्याजदर कमी आणि शैक्षणिक कर्जाला जास्त व्याजदर आकारला जातो सरकारला शिक्षण पेक्षा वाहने महत्वाची वाटतात का?, नोटाबंदी, प्लास्टीक बंदी झाली मग दारूबंदी का होत नाही?, असे अनेक सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर आधारीत प्रश्न रा.भा.शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत यांना विचारले. या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही मोकळेपणाने सामंत यांनी दिली. अशा प्रकारे थेट विद्यार्थ्यांमध्ये जावून संवाद साधण्याचा पहिलाच कार्यकम युनिसेफकडून घेण्यात आला.

युनिसेफ, नवी उमेद आणि संप्रर्पच्या माध्यमातून रा. भा.शिर्के प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. युनिसेफच्या रत्नागिरी प्रतिनिधी पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय विचारपूर्वक प्रश्न आमदार सामंत यांना विचारले. अलीकडे सरकारकडून महत्वाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले जात नाही, शैक्षणिक बाबींमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी काय करता येईल? आठवीपर्यंत सर्व विद्यार्थी पास हा निर्णय योग्य की अयोग्य यावर विद्यार्थ्यांनी आमदार सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांची ही वैचारिक बुध्दिमत्ता पाहून सामंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. वाहन कर्जावर कमी आणि शैक्षणिक कर्जावर जास्त व्याजदार का दिला जातो या प्रश्नावर आ.सामंत यांनी आपण मेहनत करून चांगली गुणवत्ता मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त करूया, शैक्षणिक लोन संदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे आपण याविषयी नक्कीच विचार करूया असे सांगितले.

रत्नागिरीतील मुलांची स्पर्धा परिक्षेतील टक्केवारी वाढण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काय कराल असाही प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला असता, आपल्या माध्यमातून अरूअप्पा स्पर्धा परीक्षा केंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे. यासाठी आपण वारंवार पाठपुरावा केला होता. या स्पर्धा मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांनी स्वत:हून करून घेतले पाहिजे, यासाठी पालक आणि मुलांचीही मानसिकता बदलली पाहिजे अधिकाधिक मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळले पाहिजे असे आवाहनही त्यांनी प्रश्नाला उत्तर देताना केले. याचबरोबरच विद्यार्थ्यांनी गावात एस.टी.बसेस जात नाहीत, मुलींना सुरक्षित प्रवास हवा आहे? गरीब मुलांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे? असे विविध प्रश्न विचारले यावर सामंत यांनी मुलांना समाधानकारक उत्तरेही दिली.