परळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र

3

सामना प्रतिनिधी । बीड 

परळीच्या लोकप्रतिनिधींनी अद्यापपर्यंत परळीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न न केल्याने सत्तेची व पक्षीय राजकारणाची उच्चपदे भुषवूनही परळीकर जनता विकासासाठी आतुरलेली राहिली. आगामी काळात मी माझ्या निधीतून परळीच्या विकासासाठी ५० लाख रूपये निधी देणार असल्याचे आ.विनायक मेटे यांनी जाहीर केले. ते परळी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात शिवसंग्रामच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात  आ.विनायक मेटे म्हणाले की, “मागील  काळात परळी शहर व तालुक्यात कुठलाही मोठा प्रकल्प आलेला नाही. तसेच एमआयडीसीचे भिजते घोंगडे कायम आहे. या भागातील लोकप्रतिनिधींना परळीच्या विकासासाठी बरेच काही करता आले असते. परळीचा विकास लातूर, नांदेडच्या विकासाप्रमाणे झाला असता, परंतू असे झाले नाही. तसेच राज्यात शिवसंग्रामची ताकद वाढली असून मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही लढविलेल्या जागावर मतदारांनी आम्हाला भरभरून साथ दिली आहे. मतदारांच्या व कार्यकर्त्याच्या या पाठबळावर भविष्यात आम्ही शिवसंग्राम म्हणून स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू” असे सांगीतले.

यावेळी कार्यकर्ता मेळाव्यानंतर परळी मतदारसंघातील शिवसंग्राम कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाकर कोलनगडे  , अशोक लोढा ,देवराव कदम, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पंकजा मुंडे आणी विनायक मेटे मधील शीतयुद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे, मुंबईत मेटेची बडदास्त ठेवली जात असली तरी बीड जिल्ह्यातील भाजप मात्र मेटेंची दखल घेत नसल्याचे नेहमीच जाणवते. त्यातच मेटे समर्थक राहिलेल्या राजेंद्र मस्के यांनी शिवसंग्राम सोडून भाजपशी सलगी केली आणि आता 26 जानेवारीला राजेंद्र मस्के यांच्या अत्याधुनिक सुसज्ज गो शाळेचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते होत आहे, त्यामुळे मेटे ही आता परळीकडे कूच करू लागले आहेत.