लखनऊमध्ये भरधाव कारने आठ जणांना चिरडले,चार ठार

सामना ऑनलाईन। लखनऊ

लखनऊमध्ये मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवणा-या एका माजी आमदारपुत्राने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ८ जणांना चिरडले आहे. यातील चारजणांचा मृत्यू झाला असून इतरांवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.

लखनऊमध्ये डीजीपी आवास परिसरात बांधकाम सुरु आहे. यामुळे ब-याचशा मजूरांनी  तेथेच रस्त्याच्या कडेला संसार थाटला आहे. शुक्रवारी रात्री हे सगळे मजूर रस्त्याच्या कडेला गाढ झोपले होते. त्याचवेळी रात्री दिडच्या सुमारास अचानक भरधाव वेगात असलेली एक कार या आठ मजूरांना चिरडत पुढे निघून गेली. याप्रकारानंतर सगळीकडे एकच धावाधाव झाली.जो तो जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावू लागला. याप्रकारामुळे हादरलेल्या चालकाने कार रस्त्यामध्येच थांबवली व तो पळून जाऊ लागला. पण लोकांनी कारचालकासह कारमध्ये बसलेल्या तीनजणांना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.यात माजी आमदार अशोक रावत यांच्या मुलासह एका उद्योगपतीच्या मुलाचा समावेश आहे.पोलिस अधिक तपास करत आहेत.